गटनेत्यासह प्रदेशाध्यक्ष निर्णयही लांबणीवर? चेन्नीथला यांची आमदार, पराभूत उमेदवारांशी चर्चा
By कमलेश वानखेडे | Updated: December 18, 2024 08:14 IST2024-12-18T08:13:48+5:302024-12-18T08:14:27+5:30
रमेश चेन्नीथला यांनी आमदार व पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष बदलवायचा की नाही, नवा चेहरा कोण असू शकतो, अशीही विचारणा करण्यात आली.

गटनेत्यासह प्रदेशाध्यक्ष निर्णयही लांबणीवर? चेन्नीथला यांची आमदार, पराभूत उमेदवारांशी चर्चा
कमलेश वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विधानसभेतील काँग्रेस गटनेतेपदी कुणाला संधी द्यावी, प्रदेशाध्यक्ष बदलावा की कायम ठेवावा, याबाबत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसचे विधानसभा व विधान परिषदेतील आमदार तसेच पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. काही आमदारांनी आपले मत स्पष्टपणे नोंदविले, तर काहींनी पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल, असे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी गटनेत्याची नियुक्ती होण्याची शक्यता नाही, तर प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णयही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ७च्या सुमारास रमेश चेन्नीथला दाखल झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, आरिफ नसीम खान, यशोमती ठाकूर, भाई जगताप, विकास ठाकरे आदी उपस्थित होते. चेन्नीथला यांनी एका रूममध्ये आमदार व पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. विधानसभेतील १६ पैकी १५ आमदार तर परिषदेतील ८ पैकी ७ आमदार आणि पराभूत ४७ उमेदवारांनीही चेन्नीथला यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभेच्या आमदारांना गटनेते पदाबाबत नाव सुचविण्यास सांगण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष बदलवायचा की नाही, नवा चेहरा कोण असू शकतो, अशीही विचारणा करण्यात आली. आमदारांनी व्यक्त केलेली मते चेन्नीथला यांनी नोंदवून घेतली. पराभूत उमेदवारांनाही प्रदेशाध्यक्षाबाबत विचारणा करण्यात आली. या चर्चेत मांडण्यात आलेल्या मतांचा अहवाल चेन्नीथला हे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविणार आहेत. यानंतर गटनेतेपदाचा निर्णय दिल्लीतून कळविला जाईल, तर प्रदेशाध्यक्षांबाबतचा निर्णय घ्यायला काही कालावधी लागेल, असे काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
ईव्हीएमवर परस्परविरोधी मते
चेन्नीथला यांनी सर्वच पराभूत उमेदवारांना ईव्हीएमचा दोष वाटतो का, अशी विचारणा केली. त्यावर बहुसंख्य उमेदवारांनी बूथची आकडेवारी सांगत ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काही उमेदवारांनी ईव्हीएमवर नारळ फोडणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढलाच नाही, अशी रोखठोक भूमिकाही मांडली.