लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यातील जिल्ह्यात प्रवासाच्या परवानगीसाठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले त्याच्या परवानगीबाबत येत्या ६ मे रोजी कळविण्यात येईल, तसेच ई-पास संदर्भात २ मेनंतरच्या अजार्बाबत ८ मेपासून निर्णय घेण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती देत याबाबत पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. परवानगीचा अर्ज ज्या जिल्ह्यासाठी आहे त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतल्यानंतरच परवानगी देण्यात येईल, असेही स्पष्ट केले.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, परवानगी मिळण्याबाबतच्या अर्जामध्ये ४,४९० अर्ज शासनाने वाहन व्यवस्था करावी याबाबतचे आहेत. रेल्वेची व्यवस्था झाल्यावर मोबाईलवर अर्जदारास कळविण्यात येणार आहे. स्वत:च्या वाहनाने जाण्याबाबत २,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ८३ अर्ज नागपूर शहरातील कंटोन्मेंट झोनमधील असल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. २२६ अर्जदारांनी नागपूर येथील त्यांचा पत्ता नमूद केला नाही व अपूर्ण आहे. उर्वरित २,१५३ अर्जांमध्ये ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला. या २,१५३ अर्जदारांना ६ मे रोजी महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी कार्यालय येथील सेतू अथवा तहसील कार्यालयामधून परवानगीचे वितरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ८६२ अर्जदारांच्या परवानगीचे वितरण संबंधित तहसीलदार कार्यालयातून केल्या जाणार आहे.परवानगीसाठी महाराष्ट्र पोलीस ई-पास प्रणालीवर ज्या अर्जदारांनी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरील क्षेत्रातून अर्ज केले आहेत, त्याबाबत ऑनलाईन ८ मेपासून कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.