लिपिकाने सभापती व विभागप्रमुखांना ठेवले अंधारात नागपूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील १८ लाख रुपयांचा निधी अध्यक्षांनी आपल्या सर्कलमध्ये वळविल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी वित्त व लेखा अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. सोमवारी झालेल्या समाजकल्याण समितीच्या बैठकीत निधी वाटपाची जुनी यादीच रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे हा प्रकार एका लिपिकाने सभापती व विभागप्रमुखाला अंधारात ठेवून परस्पर निधी वाटपाची यादी मंजूर केली होती. आज समितीच्या बैठकीत लिपिकाचा हा प्रकार उघडकीस आला. सेस फंडाच्या २० टक्के निधीचे समान वाटप करण्यासाठी समाजकल्याण समितीची बैठक झाली होती. बैठकीत समितीतील प्रत्येक सदस्याला ७-७ लाख रुपये देण्याचे ठरविले होते. तसेच मागासवर्गीय भागातील प्रस्ताव पाहून समान निधीचे वाटप करण्याचे ठरले होते. अध्यक्ष निशा सावरकर यांना ११ लाख रुपये देण्याचेही ठरविण्यात आले. परंतु त्यांनी आणखी निधी वाढवून देण्याची मागणी केली. अध्यक्ष असल्यामुळे त्यांना १५ लाख देण्याचे समितीने मान्य केले. त्यानुसार निधी वाटपाची यादीही तयार झाली. परंतु समाजकल्याण विभागात दलित वस्तीचा टेबल पाहणारे लिपिक गुंडमवार यांच्यावर दबाव टाकत त्यांच्याकडून जादाचे चार लाख यादीत समावेश केल्याचे गेडाम म्हणाले. त्यामुळे गुंडमवार यांनी परस्पर बदलही करून टाकला. मंजूर यादीवर सभापती अथवा विभागप्रमुखांची स्वाक्षरी न घेता लिपिक गुंडमवार यांनी परस्पर यादीत बदल व मंजूर करून ती पंचायत समित्यांना पाठविण्याचा पराक्रम केला. समितीच्या बैठकीत गुंडमवार यांनी हे मान्यही केले. (प्रतिनिधी)दुसरी यादी तयार होणारअध्यक्षांच्या दबावाखाली लिपिकाने परस्पर बदल केलेली यादी सभापती गेडाम यांनी रद्द केली आहे. उद्या मंगळवारी दुसरी नव्याने यादी तयार करण्यात येणार असून, नवीन यादीत कोणताही सदस्य निधीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे गेडाम यांनी सांगितले.
अध्यक्षांनी पळविलेला निधी थांबविला समाजकल्याण समितीने घेतला निर्णय :
By admin | Published: February 07, 2017 2:05 AM