नागपूर : ऑगस्टच्या अखेरपासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सरासरीपेक्षा अधिक आणि गरजेपेक्षा अतिरिक्त पाऊस झाला असून, जिल्ह्यात ओला दुष्काळाचे सावट पसरले आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत १०९ टक्के पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. सरकारी नियमानुसार ११० टक्क्याहून अधिक पाऊस झाल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो. तर मंगळवारी सकाळी जिल्हाभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला. अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे.
खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहून संबंधित मागणी केली आहे. तुमाने यांनी पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस काटोल व नरखेड तालुक्यात पडतो. मात्र यावेळी या दोन्ही तालुक्यात आतापर्यंत ११९ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय हिंगणा, कळमेश्वर, भिवापूर, कामठी, सावनेर या तालुक्यात ओला दुष्काळाची परिस्थिती आहे. तर उर्वरित सहापैकी नागपूर ग्रामीण, कुही, उमरेड, मौदा या चार तालुक्यांमध्येही ओल्या दुष्काळाचे संकट ओढवणार आहे. तब्बल सात तालुक्यांमध्ये ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे तेथील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तुमाने यांनी केली आहे.
पिकांचे नुकसान
- मागील २० दिवसात सुमारे ३०० मिमी पाऊस झाला आहे. जमिनीत सतत ओल असल्यामुळे आणि जमिनीतून पाणी पाझरत असल्याने संत्रा, कापूस, सोयाबीन व तुरीसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य आहे. याशिवाय अनेक गावात अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.