सावनेर/उमरेड/कुही/कळमेश्वर/हिंगणा/काटोल/ रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. रविवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात करण्यात आलेल्या ८७५ चाचण्यात १२६ (१४.४ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात एकाचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४१,९९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील १,३६,८८६ कोरोनामुक्त झाले. २२८८ रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी ४१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या ग्रामीण भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २४१८ इतकी आहे.
हिंगणा तालुक्यात २७० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ६ , निलडोह , डिगडोह, हिंगणा येथे प्रत्येकी २ तर वडधामना येथे एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,९११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ११,०२४ कोरोनामुक्त झाले आहेत.
कळमेश्वर तालुक्यात दोन रुग्णांची नोंद झाली. यात नांदीखेडा व उबाळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. काटोल तालुक्यात २२२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील १ रुग्ण तर ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा व येनवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मोडणाऱ्या गावात प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यात १५० जणांच्या चाचण्या करण्यात आली. तीत धानोली येथे एका रुग्णांची नोंद झाली. रामटेक तालुक्यात ४ रुग्णांची नोंद झाली. चारही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. उमरेड तालुक्यात ३ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील एक तर ग्रामीण भागातील २ रुग्णाचा समावेश आहे.
नरखेडमध्ये ग्रामीणमध्ये स्थिती सुधरेना
नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. तालुक्यात ग्रामीण भागात ९ रुग्णांची नोंद झाली. सध्या ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४४ तर शहरात १३ इतकी आहे. ग्रामीण भागातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्ग (३ ) मोवाड (३), मेंढला (१) तर भिष्णूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मोडणाऱ्या गावात दोन रुग्णाची नोंद झाली.