लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील रनाळा येथील रिद्धिसिद्धी टाऊनशिपमधील पुरुषोत्तम ले-आऊटमध्ये राहणाऱ्या दोन माजी सैनिकांच्या घरी मंगळवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यातील एका माजी सैनिकाच्या घरातून १ लाख १० हजार रुपयांचा माल लंपास केला. दुसऱ्या माजी सैनिकाच्या घरातून काहीही हाती न लागल्याने दरोडेखोरांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले. यासंदर्भात माजी सैनिक सुनील डेव्हिड यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध कलम ३९५,४५७, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, सदर घटनास्थळ असलेल्या रिद्धिसिद्धी टाऊनशिपमध्ये ३० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. सुनील डेव्हिड हे २०१४ मध्ये सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते रिद्धिसिद्धी टाऊनशिपमध्ये वास्तव्यास आले. ते पत्नी व दोन अपत्यांसह येथे राहतात. मंगळवारी रात्री जेवण करून डेव्हिड कुटुंबीय झाेपी गेले. मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास तोंडावर कापड बांधून असलेल्या पाच दरोडेखोरांनी मास्टर चावीने दार उघडून अवैधरीत्या घरात प्रवेश केला. त्यांनी तळमजल्यावर झोपले असलेल्या डेव्हिड यांचा मुलगा-मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, घरात आवाज येताच पहिल्या माळ्यावर झोपलेले डेव्हिड व त्यांची पत्नी खाली आले असता त्यांना दरोडेखोरांनी धाक धाकवीत मुलांना मारण्याची धमकी दिली. यानंतर ते डेव्हिड यांच्या पत्नीच्या पर्समधून १० हजार रुपये, सोन्याची अंगठी तसेच वरच्या माळ्यावरील कपाटात असलेले पिस्तूल घेऊन पसार झाले. यानंतर ते शेजारीच कुलूपबंद असलेले दुसरे माजी सैनिक शरद सहारे यांच्या घरात शिरले. मात्र घरात कुणी नसल्याने तेथील साहित्य अस्ताव्यस्त करीत ते टीव्ही घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार ताफ्यासह तिथे दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक विनायक आसटकर यांनी घटनास्थळाची पाहणी करीत पंचनामा केला.
सीसीटीव्हीत कैदआरोपींचा काहीतरी सुगोवा लागावा यासाठी पोलिसांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत दरोडेखोर पसार होताना दिसल्याची माहिती आहे.