लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा/रेवराल : सावळी (ता. माैदा) शिवारात जमिनीत पुरलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पाेलिसांना यश आले. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आणि दाेन आराेपींना अटक करून एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. हा मृतदेह बुधवारी (दि. ३१) दुपारी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला.
सुमित गणपत यादव (२८, रा. सैलाबनगर, न्यू कामठी) असे मृताचे तर दीपक अरुण त्रिवेदी (३२, रा. सुरेखा वॉर्ड, कामठी) व आकाश योगेश नारनवरे (१९), अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला विधिसंघर्षग्रस्त बालक आणि आकाश नारनवरे हे खापा थोळी साईमंदिर रोड तुमसर, जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहेत. सावळी शिवारातील जमिनीत मृतदेह पुरला असल्याची माहिती पाेलीस पाटील गुणाकार कवडू इंगोले (५२) यांनी पाेलिसांना दिली हाेती.
डाेके प्लास्टिकच्या पाेत्यात टाकून मानेभोवती दाेरी गुंडाळलेली हाेती. प्रथमदर्शनी पुराव्यावरून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने, पाेलिसांनी सुरुवातीला त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शिवाय, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयाे रुग्णालयात पाठविला. त्याची ओळख पटताच आराेपींना अवघ्या १२ तासात पाेलिसांनी तुमसर (जिल्हा भंडारा) येथून ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. आराेपींना शुक्रवारी (दि. २) न्यायालयात हजर केले जाणार असून, पाेलीस काेठडी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी सांगितले. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साखरकर करीत आहेत.
....
पाणी व चहावरून भांडण
विजय डोंगरे (३५, रा. रामगड, कुंभारे कॉलनी, कामठी) हा सराईत गुन्हेगार असून, त्याने सात महिन्यापूर्वी सावळी शिवारात धाबा सुरू केला हाेता. सुमित त्या धाब्यावर नाेकर म्हणून काम करायचा. आकाश व विधिसंघर्षग्रस्त बालक या परिसरातील कंपनीत कामगार म्हणून काम करायचे. आराेपी दीपकने १५ दिवसापूर्वी या धाब्यावर नाेकर म्हणून कामाला सुरुवात केली हाेती. राख व पाणी टाकण्यावरून सुमित व दीपक यांच्यात भांडण व आपसात हाणामारी झाली हाेती. हा प्रकार दीपकने आकाश व विधिसंघर्षग्रस्त बालकास सांगितला. या दाेघांचे सुमितसाेबत चहाच्या बिलावरून भांडण झाले हाेते.
...
झाेपेत डाेक्यावर केले वार
आराेपींनी सुमितला ४ मार्चच्या सायंकाळी बेदम मारहाण केली हाेती. त्यानंतर त्यांनी सुमित ५ मार्चच्या रात्री गाढ झाेपेत असताना त्याच्या डाेक्यावर फावड्याने वार केले. त्याचा उजवा हात शरीरापासून वेगळा केला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला हाेता. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी सुमितचा मृतदेह धाब्याच्या बाजूला असलेल्या राखेच्या ढिगाऱ्यात पुरला. राख पसरल्यास मृतदेह बाहेर येईल म्हणून त्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत खड्डा खाेदला आणि त्यात मृतदेह पुरला. तत्पूर्वी यांनी मृताचे कपडे, टायर टाकून जाळले हाेते. आराेपींनी गुन्ह्याची कबुली देत हा सर्व घटनाक्रम पाेलिसांना सांगितला.