लाखोंचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील हसनबाग परिसरातील श्रीकृष्णनगर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेजवळील खुल्या प्लॉटवर ठेवलेल्या डेकोरेशन साहित्याला बुधवारी सकळी ८.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत खुर्च्या, सोफा, डेकोरेशन साहित्य, बल्ल्या, बासे, फर्निचर जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीत एक घोडाही जखमी झाला. अग्निशमन विभागाला माहिती मिळाल्यानंतर काही वेळात चार गाड्या घटनास्थळी पोहचल्या व आग आटोक्यात आणली.
श्रीकृष्णनगर चौक येथे तुषार राठोड यांचा शहानी इव्हेन्ट डेकोरेशन आहे. परिसरात पांडव यांच्या मोकळ्या जागेत डेकोरशन साहित्य, सोफा, खुर्च्या व अन्य साहित्य ठेवण्यात आले होते. ते जळून खाक झाले. बाजूलाच सात घोडे बांधले होते सुदैवाने ते बचावले. मात्र यातील एक घोडा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाच्या लकडंगज, केंद्राच्या दोन, कळमना व सक्करदरा येथील फायर स्टेशनच्या प्रत्येकी एक अशा चार गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु शाॅर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात लकडगंज केंद्र अधिकारी मोहन गुडधे व जवानांनी ही आग आटोक्यात आणली.