हायकोर्ट बार असोसिएशनचा पदग्रहणसमारंभ : न्या. बोबडे यांचे प्रतिपादन नागपूर : न्यायालयांवरील प्रलंबित खटल्यांचा भार ही फार जुनी आणि मोठी समस्या राहिली आहे. यासाठी विविध कारणे कारणीभूत ठरत आहेत. न्यायालयांवरील हा भार कमी करण्यासाठी वकिलांच्या सकारात्मक दृष्टिकोनासह पुढाकाराची गरज आहे. त्याशिवाय ही समस्या सुटूच शकत नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी केले. नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीचा शुक्रवारी पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. सिव्हिल लाईन्समधील वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे महाधिवक्ता अॅड़ रोहित देव, हायकोर्ट बार असोसिएशनचे मावळते अध्यक्ष अॅड़ अरुण पाटील व सचिव श्रद्धानंद भुतडा यांच्यासह नवनियुक्त अध्यक्ष अॅड़ अनिल किलोर आणि सचिव प्रफुल्ल खुबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करू न कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी न्या. बोबडे यांनी हायकोर्ट बार असोसिएशनच्या इतिहासाला ओझरता स्पर्श करीत, अध्यक्षांच्या निवडीविषयी माहिती दिली. शिवाय आज बारला अनेक अधिकार असून, त्या अधिकारांचा बार असोसिएशनने अनेकदा निर्भिडपणे उपयोगही केला असल्याचे ते म्हणाले. नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे नागपूर खंडपीठातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नेहमीच सहकार्य मिळाले आहे. शिवाय भविष्यातही त्या प्रयत्नांची गरज आहे. हायकोर्ट बार असोसिएशन विदर्भातील एक महत्वाची संघटना आहे. त्यामुळे बार असोसिएशने विदर्भातील सर्व लहान संघटनांना एकत्रित करू न, त्यांचे नेतृत्व केले पाहिजे, अशी त्यांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय बारने कनिष्ठ वकिलांना तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक ज्येष्ठ वकिलांनी दहा कनिष्ठ वकिलांची जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यांनी सुचविले. दरम्यान त्यांनी बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते हायकोर्ट बार असोसिएशनच्या ‘स्टडी सर्कल’ या वार्षिकांकाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अॅड़ राधिका बजाज यांनी केले तर बार असोसिएशनचे नवनियुक्त सचिव अॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
प्रलंबित खटल्यांचा भार कमी व्हावा
By admin | Published: April 15, 2017 2:12 AM