सावनेर/काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तरी संक्रमणाचा दर २६ टक्क्यांवर आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यांत ३२६२ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ८५१ (२६.०८ टक्के) रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,३४,९३५ इतकी झाली आहे. यातील २१५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या अहवालानुसार ग्रामीण भागात २२ रुग्णांचा मृत्यू झाला तर २४७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ग्रामीण भागात आतापर्यंत १,१४,८९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७,८१८ इतकी झाली आहे.
नरखेड तालुक्यात ८१ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील २ तर ग्रामीण भागातील ७९ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४५३ तर शहरातील ४९५ इतकी झाली आहे. जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात (४), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ७५ रुग्णांची नोंद झाली. काटोल तालुक्यात १४९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १४९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ३ तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्रांतर्गत ६, कोंढाळी (५) तर येनवा केंद्रांतर्गत ४ रुग्णांची नोंद झाली. उमरेड तालुक्यात ५८ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ३७ रुग्णांचा समावेश आहे.
कुही तालुक्यातील विविध केंद्रांवर १३९ नागरिकांच्या चाचण्यात करण्यात आल्या. तीत कुही व तितूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. रामटेक तालुक्यात ८ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरात १ व ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतार्पंत ६३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ५८२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १२३ जणांचा मृत्यू झाला. तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६० इतकी आहे.
सावनेर तालुक्यात १५ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील ७ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ७० रुग्णांची नोंद झाली. हिंगणा तालुक्यात २४७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात टाकळघाट येथे १२, वानाडोंगरी (५), डिगडोह व जुनेवानी प्रत्येकी ३, हिंगणा, घोडेघाट प्रत्येकी २, इसासनी, अडेगाव, संगम, गोंडवाना, खैरीमोरे , गणेशपूर, शिरूळ, टेंभरी व रायपूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ११,२८५ झाली असून यातील १०,००६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कळमेश्वर तालुक्यात कहर
कळमेश्वर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. शुक्रवारी तालुक्यात आणखी २२४ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ६४ तर ग्रामीण भागातील १६० रुग्णांचा समावेश आहे.