लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असताना कोरोना प्रतिबंधक लसीकरणात घट होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुरुवारी नागपूर जिल्ह्यात ५०० कोरोनाबाधितांची नोंद झाली असताना ३३०० पैकी १०४८ म्हणजे ३२ टक्केच लाभार्थ्यांनी लस घेतली. यात ग्रामीणमध्ये ३३.९२ टक्के, तर शहरामध्ये ३४. ५ टक्के लसीकरणाचा समावेश होता.
नागपूर जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली. १३ फेब्रुवारी रोजी ‘बूस्टर डोस’ दिला जाणार आहे. २८ दिवसांचा कालावधी पूर्ण होत असतानाही दैनंदिन लसीकरण ५० टक्क्यांवर जात नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात आज १५ केंद्रावर १२५९ लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ४२७ लाभार्थ्यांनी लस घेतली. यात सर्वाधिक, ७९ टक्के लसीकरण हिंगणा केंद्रावर झाले. सर्वांत कमी, ४ टक्के लसीकरण कळमेश्वर केंद्रावर झाले. शहरात १८०० लसीकरणाचे लक्ष्य होते, त्यापैकी ६२१ लाभार्थ्यांनी लस घेतली. १८ केंद्रापैकी सर्वाधिक, ७० टक्के लसीकरण ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये झाले. सर्वांत कमी, ७ टक्के लसीकरण जाफरी हॉस्पिटलमध्ये झाले. इतर केंद्रामध्ये मेयोमध्ये ३२ टक्के, डागामध्ये १३ टक्के, पाचपावली हॉस्पिटलमधील ‘अ’ केंद्रावर ५१ टक्के, ‘ब’ केंद्रावर ३० टक्के, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ६८ टक्के, मेडिकलमध्ये १२ टक्के, सिम्स हॉस्पिटलमध्ये ३० टक्के, दंदे हॉस्पिटलमध्ये २७ टक्के, वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये २० टक्के, भवानी हॉस्पिटलमध्ये २६ टक्के, किंग्जवे हॉस्पिटलमध्ये ४२ टक्के, अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये ३७ टक्के, म्यूर मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये १६ टक्के, आयजीआर हॉस्पिटलमध्ये ४७ टक्के, तर पोलीस हॉस्पिटलमध्ये ५४ टक्के लसीकरण झाले.