लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंद्रपूर आणि गाेंदिया वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने थाेडा दिलासा दिला. नागपुरात दिवसभर आकाश ढगाने दाटले हाेते पण सायंकाळी सूर्यदर्शन घडले. शहरात सकाळपर्यंत ७१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र पावसाने जाेरदार तडाखा दिला तर गाेंदिया जिल्ह्यातही सकाळपर्यंत जाेरदार मुसंडी मारली. विभागातील सहा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीपेक्षा ५४ टक्के अधिक पावसाची नाेंद करण्यात आली.
पूर्व विदर्भात दाेन दिवसांपासून पावसाने चांगलीच कृपादृष्टी केली. सहाही जिल्ह्यात सकाळपर्यंत एकूण ५२.३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली. शहरात १२१.९ मिमी तर जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नाेंद झाली. गाेंडपिपरी, वराेरा, सिंदेवाही, राजुरा, काेरपना, बल्लारपूर, जिवती या तालुक्यात धाेकादायक पातळीपेक्षा अधिक पावसाची नाेंद झाली. दुसरीकडे गाेंदिया जिल्ह्यात ४७.१ मिमी पावसाची नाेंद झाली. शहरात ९८.४ मिमी नाेंदविला गेला. यानंतर भंडारा २५.९ मिमी, गडचिराेली १६.६ मिमी तर वर्धा जिल्ह्यात ५४.६ मिमी पाऊस नाेंदविण्यात आला. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०७२ मिमी पाऊस नाेंदविला जाताे. मागील वर्षी ४१८ मिमी पावसाची नाेंद झाली हाेती. यावर्षी आतापर्यंत ५१० मिमीची नाेंद झाली असून सरासरीच्या तुलनेत ११२ टक्के आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये अमरावतीत सकाळपर्यंत १९ मिमी, यवतमाळ १९ मिमी, वाशिम ५ मिमी तर अकाेला ५.४ मिमी पावसाची नाेंद झाली.
मागील वर्षीच्या तुलनेत अधिक
नागपूर विभागात २४ तासात २२० मिमी नाेंद झाली. गेल्या वर्षी २३ जुलैपर्यंत ४१८ मिमी पावसाची नाेंद झाली हाेती, जी सरासरीच्या ९१.८ टक्के हाेती. यावर्षी आतापर्यंत ५१० मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. जी सामान्यच्या तुलनेत ११२ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.२ टक्के अधिक आहे.
जिल्हा - सरासरी पाऊस - आतापर्यंत झालेला पाऊस - टक्केवारी
वर्धा - ३७७.१ ४७८.६ १२६.९२
नागपूर - ३९२.१ ४५४.१ ११५.८१
भंडारा ४७३.२ ५१४.२ १०८.६६
गोंदिया - ५००.६ ४४९.३ ८९.७५
चंद्रपूर ४४८.५ ६९८.५ १५५.७४
गडचिरोली - ५२८.४ ४७२.४ ८९.४