नागपूर : अपंगांच्या संस्था समर्पित वृत्तीने चालविल्यास त्यातून गुणवंत पुढे येतील,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) संचालित कर्णबधिर विद्यालय सोनेगाव या संस्थेच्या रजत जयंती महोत्सवानिमित्त गंगाधरराव फडणवीस आणि दिवाकरराव जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित अंध व कर्णबधिरांच्या बुद्धिबळ स्पर्धा तसेच कामगार नेते गो.म. खाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्णबधिरांच्या कॅरम स्पर्धेचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नाना पटोले, माजी खासदार दत्ता मेघे, डॉ. विलास डांगरे, चंद्रकांत कलोती, संस्थेचे मुख्य सचिव दिलीप धोटे, माजी आमदार यादवराव देवगडे उपस्थित होते.दिलीप धोटे व त्यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी अपंगांच्या शिक्षणासाठी समर्पित भावनेने आंदोलने केली. पण त्यांच्या पदरी विशेष असे काही पडले नाही. आता त्यांना आंदोलने करण्याची वेळ येणार नाही, शासन त्यांना सर्वोतोपरी मदत करेल, असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. (प्रतिनिधी)
अपंगांच्या संस्था समर्पित वृत्तीने चालवा -मुख्यमंत्री
By admin | Published: December 14, 2014 12:41 AM