लोकमत न्यूज नेटवकं
नागपूर : महापालिकेच्या हिवरीनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण गुरुवारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर मनीषा धावडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर आदी उपस्थित होते.
या आरोग्य केंद्रामध्ये फर्निचर, संगणक आणि टीव्हीची व्यवस्था टाटा ट्रस्टच्या माध्यमाने करण्यात आली आहे. मनपातर्फे डॉक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियनची व औषधी सुविधा देण्यात आली आहे. गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक आणि बीपीएलधारक नागरिकांना मोफत उपचार मिळतील. राधाकृष्णन बी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, आरोग्य केंद्राच्या पहिल्या माळ्यावर ऑक्सिजन बेडची सुविधा करण्याचे निर्देश दिले.
या केंद्रावर बाह्य रुग्ण तपासणी, प्रसूतीपूर्व तपासणी, बालरोग तपासणी, कुटुंबकल्याण समुपदेशन, कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी, हिवताप व हत्तीरोग निदान आणि उपचार, रक्तदान, मधुमेह तपासणी व उपचार, औषधी आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.