नगरसेवक नितीश ग्वालबन्शी यांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक नितीश ग्वालबन्शी यांच्या प्रयत्नांनी गिट्टीखदान चौक येथील याराना सेलिब्रेशन लॉन सभागृहात ३० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. लोकार्पणप्रसंगी आमदार विकास ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गंगाप्रसाद ग्वालबन्शी उपस्थित होते.
३० बेडच्या कोविड सेंटरमध्ये २० बेड ऑक्सिजनचे आहेत. उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची औषध तसेच जेवण, नाश्ता, गरम पाणी, स्टीमर आदी व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम नागपुरात एकही सरकारी रुग्णालय नसल्याने गोरेवाडा, गिट्टीखदान, बोरगाव, पोलीस लाईन टाकळी व मकरधोकडा परिसरातील नागरिकांना या केंद्राचा लाभ होणार आहे. या कोविड सेंटरसाठी विकास ठाकरे यांनी आपल्या विकास निधीतून २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. ग्वालबन्शी यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर नगरसेवकांनीही असे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
एसजीवाय इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियाक सायन्सचे डॉ. जितेंद्र यादव हे कोविड केअर सेंटर संचालित करीत आहेत. यावेळी रितेश लव्हात्रे, राकेश राज करोसिया, मंजू चाचेरकर, जोजी मंगलशेरी, आशिष पांडे, दिनेश पाल, मनीष निखार, रोमी सिंह, मंगेश चव्हाण, राजा वानखेडे, मामा दुपारे, रितेश परसराम, प्रशांत गुजवार, चंपा शर्मा, कुमार त्रिवेदी आदी उपस्थित होते.