लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : घरी कोरोनाबाधित रुग्ण निघाला. स्वत:कडे आलिशान चारचाकी वाहने उपलब्ध आहेत. सर्व सुविधा असतानाही वाहन चालवायला कुणीही तयार नाही. अशी परिस्थिती उद्भवल्याचे विदारक चित्र अवतीभवती दिसत आहे. दुसरीकडे गोरगरीब आणि सर्वसामान्यांचे खिसे कापण्याचे धोरणसुद्धा अनेक खासगी रुग्णवाहिकांनी सुरू केले आहे. यावर सकारात्मक चिंतन करीत उमरेड येथील दोघांनी स्वत:ची वाहने रुग्णसेवेसाठी अर्पण केली आहेत.
दुसऱ्यांकडे बोट दाखविण्याऐवजी आपणच चांगल्या कामाचा आरंभ करायचा, या विचारप्रवाहामुळे आता उमरेड, भिवापूर कुही आणि सोबतच नागपूरलासुद्धा रुग्णवाहिकेची सेवा धडाक्यात सुरू केली. उमरेड येथील अनिकेत बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका माधुरी भिवगडे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन यांनी स्वत:कडील चारचाकी वाहने कोरोना रुग्णांसाठी उमरेड येथील शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाकडे सुपूर्द केली. या आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन यांनी स्वत:कडील एकमेव चारचाकी वाहन उमरेड, भिवापूर आणि कुही येथील कोरोना रुग्णांसाठी शिवस्नेहला सोपविण्यात आले. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पोहोचविण्याची व्यवस्था. शिवाय, कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्यांना त्यांच्या गावात घेऊन जाण्याचे दायित्व या वाहनाच्या माध्यमातून सुरू झाले असून, गावखेड्यातील सर्वसामान्यांसाठी ही सेवा नि:शुल्क असल्याने लाखमोलाची ठरत आहे.
नागपूरसाठी अतिशय अल्पदरात रुग्णवाहिका नसल्याने असंख्य रुग्णांची, कुटुंबीयांची त्रेधा उडत होती. अनेकांना आर्थिक, मानसिक त्रास सोसावा लागत होता. ही बाब माधुरी भिवगडे यांना कळली. लागलीच त्यांनी शिवस्नेह गणेशोत्सव मंडळावर विश्वास दाखवीत संस्थेची रुग्णवाहिका तातडीने सुरू करा, अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जयस्वाल यांना केली. नगरसेवक सतीश चौधरी यांनीही सहकार्य केले. संपूर्ण कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आणि रुग्णसेवा सुरू झाली.
...
इकडे लोकार्पण, तिकडे वाहन धावले
बुधवारी (दि.५) रुग्णवाहिकेची सेवा सुरू झाली. लोकार्पण कार्यक्रमात तहसीलदार प्रमोद कदम, माधुरी भिवगडे, अशोक मने, अनिल गोविंदानी, सतीश चौधरी, अनिल खानोरकर, प्रशांत जयस्वाल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. इकडे लोकार्पण होताच कोरोना रुग्णास नागपूरला रवाना करण्यासाठी फोन खणखणू लागले आणि वाहन रुग्णाला घेऊन नागपूरकडे धावले. कार्यक्रमाचे संचालन अक्षय खानोरकर यांनी केले.
...
उमरेड नगरी सामाजिक जाण असलेल्या संस्था आणि कार्यकर्त्यांची नगरी आहे. खरोखरच या परिसरातील कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची गरज होती. ती गरज या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून पूर्ण झाली. यातून नक्कीच आदर्शव्रत कार्य होईल, असा मला विश्वास वाटतो.
- प्रमोद कदम,
अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती.