नागपूर : जंतर-मंतर आणि कोणार्क सूर्यमंदिरानंतर मध्य भारतात प्रथमच सौर समयतालिका अर्थात सूर्यघडीचे लोकार्पण श्री शनि शक्तिपीठ, आर्यभट्ट ॲस्ट्रोनॉमी पार्क, कान्होलीबारा येथे करण्यात आले.
नागपूरपासून ३५ किमी अंतरावर स्थित कान्होलीबारामध्ये श्री शनि शक्तिपीठाचे संचालक आचार्य भूपेश गाडगे यांनी ही समयतालिका स्थापन केली आहे. ३ जून २०१९ रोजी या यंत्राला स्थापित करण्यासाठी गणना करण्यास सुरुवात झाली होती, असे गाडगे म्हणाले. शनिपीठाला पौराणिक काळात चक्रानगरी म्हणून ओळखले जात होते. त्याच कारणाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून येथे सौर समयतालिका बनविण्यात आली आहे. या घड्याळीत ज्योतिषशास्त्राच्या आधारावर १२ राशी, १२ लग्न दर्शविण्यात आले आहेत. दिवसा कधीही या तालिकेचे दर्शन घेता येते. अचूक वेळ, सूर्याची परिक्रमा व सावलीनुसार कुणीही या घड्याळीचे तंत्र समजून घेऊ शकतो. पुढे अशाच प्रकारची पाच यंत्र स्थापित करणार असल्याचे आचार्य गाडगे म्हणाले.
यात पंचांग दृष्टीतून नक्षत्र, तिथी, वार, योग व करण यंत्राचा समावेश असेल. या सौर समयतालिकेला जवळपास सव्वा कोटी रुपये खर्च आला आहे. याचप्रमाणे पाच यंत्रांच्या तयारीसाठी २५ ते ३० कोटी रुपये खर्च येणार आहे. नागरिकांना ज्योतिषशास्त्राचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजवून सांगणे, हाच या यंत्र स्थापनेमागचा हेतू असल्याचे गाडगे यांनी सांगितले. सौर समयतालिकेच्या लोकार्पणाला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, आमदार विकास ठाकरे, आमदार गिरीश व्यास, माजी मंत्री रमेश बंग उपस्थित होते.
.......