नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. हजारो वर्षे दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेऊन बुद्ध तत्त्वज्ञानाला समाजमनात रुजविण्याचे क्रांतिदर्शी कार्य पूर्ण केले. त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले. विशाल, उचंबळणारा, गर्जना करणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला. जय बुद्ध व जयभीमच्या जयघोषाने अख्खा परिसर दुमदुमत आहे.
हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उतरत होते. देशाच्या काेनाकोपऱ्यातूनच नव्हे, तर नेपाळ, थायलॅण्ड, जपान, श्रीलंका येथूनही अनुयायी दीक्षाभूमीवर आले आहेत. मंगळवारी लाखो अनुयायांच्या गर्दीने दीक्षाभूमी फुलून गेली. युवकांच्या झुंडीच्या झुंडी ‘जयभीम’चा नारा देत गर्दीत सामील होत आहेत. गर्दी अफाट असली तरी सर्वच एकमेकांना सांभाळून घेत आहेत. देशाच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांची भाषा विविध असली तरी ‘जयभीम’ या एकाच शब्दाने मदतीचा हात समोर करीत आहेत.
-अनुयायांच्या सेवेत शेकडो संघटना
हजारो मैलावरून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या आहेत. पाण्यापासून ते चहा-नाश्ता व दोन वेळच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. काही सामाजिक व वैद्यकीय संघटनांनी वैद्यकीय सेवेसोबतच नि:शुल्क औषधी उपलब्ध करून दिल्या.
-हाती काठी असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याने वेधले लक्ष
दीक्षाभूमीवर पुस्तकांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या १५ सेंटिमीटरपासून ते सहा फुटांचे पुतळ्यांचे स्टॉल्स आकर्षण ठरले. प्रसिद्ध शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांनी तयार केलेला हाती काठी असलेला बाबासाहेबांचा पुतळा लक्ष वेधून घेणारा होता. या वर्षी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांचे पुतळे स्टॉल्सवर उपलब्ध होते. यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकनायक बिरसा मुंडा, महाराज बसवेश्वर, संत नारायण राजगुरू, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, आदींचे पुतळे होते. या विविध पुतळ्यांसोबत अनेकांनी फोटोही काढून घेतले.