महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी यांचा विजय म्हणजे दीक्षाभूमीचा संघभूमीवर विजय आहे. ५५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळालेल्या विजयाबद्दल नागपूरचा पालकमंत्री म्हणून मला विशेष आनंद आहे. ज्या नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, त्या मतदारसंघात भाजपचा पराभव म्हणजे भाजप सरकार आणि मोदी सरकार यांच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध शिक्षित मतदारांनी नापसंती व्यक्त केली हे यातून दिसून येते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राज्यातील जनतेने या आघाडीला जनतेने आपली पसंती दर्शविली आहे, हे स्पष्ट झाले आहे.
नितीन राऊत, ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री
शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारले
उद्धव ठाकरे यांच्या नेतृृत्वात महाविकास आघाडी सरकारने उत्तम कामगिरी केली आहे. महाविकास आघाडीवरील जनतेचा विश्वास व केलेल्या कामांची पावती या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने दिली आहे. शिवसेनेची ताकद या निवडणुकीतून सिद्ध झाली आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्व निवडणुका एकत्रित लढल्यास विजय निश्चित होईल, असा विश्वास आहे.
कृपाल तुमाने, खासदार, शिवसेना