लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याच्या आरोग्यात सुधारणा झाली असल्यामुळे त्याची जामीन मिळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी अमान्य केली. तसेच, बजाजचा यासंदर्भातील अर्ज निकाली काढला.न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला. न्यायालयाने डॉक्टर व कारागृह प्रशासनाच्या अहवालांचे अवलोकन केल्यानंतर बजाजच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली जात असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच, ही बाब लक्षात घेता बजाजला वैद्यकीय कारणामुळे जामीन मंजूर केला जाऊ शकत नाही असे स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान, बजाजच्या आहारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयाने बजाजला तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार देण्यास सांगितले व याबाबत काही अडचण वाटल्यास न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली. बजाज मेडिकलमध्ये भरती असून त्याला १६ आॅगस्ट रोजी सुटी दिली जाणार आहे. त्यानंतर त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली जाईल.बजाजने पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बजाज विद्यार्थ्यांकडून विविध अनावश्यक शुल्क वसूल करीत होता. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर देणगी घेत होता. तसेच, शासनाकडूनही मदतीच्या स्वरूपात विविध अनुदाने स्वीकारत होता. बजाजतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी व अॅड. उदय डबले तर, सरकारतर्फे अॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.