योगेश पांडे
नागपूर : कंपनीतील काम संपल्यावर घराकडे जाण्यासाठी अक्षरश: धावतपळत बस पडकली आणि निवांत डोळा लागला. मात्र, जोरदार धक्क्याने डोळे उघडले आणि समोर साक्षात मृत्यूच उभा असलेला दिसला. कुटुंबीयांच्या स्वप्नांची राखरांगोळी होणार असेच विचार असताना अचानक खिडकी तोडून बाहेर पडण्याची तत्परता दाखविली आणि केवळ काही क्षणांच्या फरकाने मृत्यूला मात देण्यात ते यशस्वी झाले. बस अपघाताच्या दाहकतेतून बचावल्यामुळे एकीकडे मनात समाधान असताना दुसरीकडे सोबतच्या प्रवाशांचा झालेला कोळसा अन् डोळ्यासमोर मृत्यूचे तांडव दाखविणारी ती काळरात्र मनातून कशी पुसणार हा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
योगेश गवई व साईनाथ पवार या दोन्ही तरुणांचा सिंदखेडराजा जवळ झालेल्या बस अपघातात जीव वाचला. ‘लोकमत’ने साईनाथकडून या अपघाताची ‘आंखो देखी’ जाणून घेतली आणि तो अनुभव अंगावर काटा आणणारा होता. दोघेही औरंगाबाद येथील एका ऑटोमेशन कंपनीत कामाला आहेत. ते कंपनीच्या कामासाठीच नागपुरात आले होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांचे काम आटोपले व त्यांनी साडेपाच वाजता विदर्भ ट्रॅव्हल्सचे तिकीट बुक केले. बुटीबोरीतूनच दोघे बसमध्ये बसले. कारंजाजवळ जेवण आटोपल्यावर सर्वच प्रवासी झोपले असताना सिंदखेडराजाजवळ बसमध्ये जोरदार धक्के लागले व काही कळायच्या आतच सर्व उलथापालथ झाली. बसमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने एक खिडकी तोडली. त्याचे अनुकरण करत आम्हीदेखील खिडकी तोडून कसेबसे बाहेर आलो. आम्ही बाहेर आल्यानंतर आणखी एका प्रवाशाला हात देऊन बाहेर काढले. मात्र, मागील बाजूस आग लागली. त्यामुळे आम्ही समोरील बाजूला जाऊन चालकासमोरील मोठी काच तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठा स्फोट झाला आणि क्षणात बसने पेट घेतला. यात योगेश थोडा जखमी झाला, अशी माहिती साईनाथने दिली.
ट्रॅव्हल्सकडून सीटचा गोलमाल
विदर्भ ट्रॅव्हल्सने बुकिंग घेत असताना काही प्रवाशांची पूर्ण नावेदेखील घेतली नव्हती. त्यामुळेच संपर्क करताना अडचणी आल्या. योगेश व साईनाथ हे सीट क्रमांक १९ व २० वर बसले होते. मात्र, ते बुकिंग त्यांच्या नावे नव्हे, तर स्टारलिंक ट्रॅव्हल्सच्या नावे दाखविण्यात आले होते. सकाळी ‘लोकमत’ने संबंधित क्रमांकावर फोन केला असता तो आणखी तिसऱ्याच ट्रॅव्हल्सचा निघाला. तेथील व्यक्तीने दिलेली माहिती आणखी धक्का देणारी होती. या सीट्सवर एक महिला व पुरुष प्रवास करीत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या जागांवर बुटीबोरी येथून दोन तरुण बसले होते. ते तरुण औरंगाबादपर्यंत जाणार होते. त्यांची नावे बराच वेळ उपलब्धच झाली नव्हती.