लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विषारी साप चावलेल्या रु ग्णाला वेळेत ‘अॅन्टी स्नेक व्हेनम’ इंजेक्शन जीवनदायी ठरते. परंतु मेडिकलमध्ये एका रुग्णाला ही लस दिली असता ‘रिअॅक्शन’ आली. यामुळे तातडीने या लसीचा साठा रुग्णसेवेतून बाद केला. विशेष म्हणजे, या लसीचा पुरवठा करणाऱ्या हाफकिन कंपनीच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी मेडिकलला भेट देऊन लसीचे नमुने घेतले. अन्न व औषध प्रशासनही (एफडीए) याबाबत चौकशी करणार आहे.देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात. त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतात. यात साप चावल्याच्या धक्क्याने मरणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी, वेळेत उपचार न मिळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंश सर्वात जास्त होतात. विशेषत: ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण मोठे आहे.यामुळे ‘अॅन्टी स्नेक व्हेनम’ लसीचा साठा जिल्हा सामान्य रु ग्णालयासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रात असावा, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार मेडिकलमध्येही ही लस उपलब्ध करून दिली जाते. मेडिकलमध्ये महिन्याभरात १० ते १५ सर्पदंशाचे रुग्ण येतात. जून ते आॅक्टोबर महिन्यात या रुग्णांची संख्या वाढलेली असते. एका रुग्णाला दोनपेक्षा जास्त लस द्यावी लागते. यामुळे वर्षाला साधारण दोन ते चार हजार ‘अॅण्टी स्नेक व्हेनम’ची गरज भासते. या लसीचा पुरवठा करण्याचे देण्याचे अधिकार हाफकिन कंपनीला आहेत. याच कंपनीने पुरवठा केलेल्या एका बॅचमधील ‘अॅण्टी स्नेक व्हेनम’ लस सदोष आढळून आली.प्राप्त माहितीनुसार, गेल्या महिन्यात विषारी साप चावलेला पुरुष रुग्ण मेडिकलमध्ये दाखल झाला. त्याला ‘अॅण्टी स्नेक व्हेनम’ लस देण्यात आली. परंतु त्याला ‘रिअॅक्शन’ आले. तातडीने याची माहिती संबंधित डॉक्टरांनी औषधनिर्माणशास्त्र विभागाला दिली. त्यांनी संबंधित बॅचचा लसीचा साठा वेगळा करून रुग्णसेवेतून बाद केला. सूत्रानुसार, संबंधित बॅचच्या साधारण ५० ते ६० लस शिल्लक होत्या. याची माहिती हाफकिन कंपनीला देण्यात आली. शुक्रवारी कंपनीचा एका अधिकाऱ्याने मेडिकलला भेट देत लसीचा नमुना घेतला. याची माहिती अन्न व औषध प्रशासनालाही (एफडीए) देण्यात आल्याचे समजते.
‘रिअॅक्शन’ नव्हे ‘अॅबनार्मल रिस्पॉन्स’विषारी साप चावलेल्या रुग्णाला ‘अॅण्टी स्नेक व्हेनम’ लस दिली जाते. ही लस दिल्यानंतर ‘रिअॅक्शन’ येत नाही रुग्णाकडून ‘अॅबनार्मल रिस्पॉन्स’ मिळतो. ही सामान्य बाब आहे. तरीही याची गंभीर दखल घेऊन संबंधित बॅचचे ‘अॅण्टी स्नेक व्हेनम’ रुग्णसेवेतून बाद करण्यात आले. नवीन बॅचची लसही उपलब्ध करून देण्यात आली. पुरवठादार हाफकिन कंपनीला याची माहिती देण्यात आली असून ‘एफडीए’सुद्धा लसीचे नमुने घेणार आहे.-डॉ.विजय मोटघरेविभाग प्रमुखऔषधनिर्माणशास्त्र, मेडिकल