नागपूर विद्यापीठ : खडक्कार समितीचा अहवाल सादर होणार नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०० व्या दीक्षांत समारंभावरील सावट दूर होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अवैध पदव्यांच्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या डॉ. खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल तयार झाला आहे. हा अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत कुलगुरूंना सादर करण्यात येईल. या अहवालात खरोखरच या पदव्या योग्य आहेत की अयोग्य, याचा निर्वाळा देण्यात आला आहे. हा अहवाल दीक्षांत समारंभाच्या दृष्टीने सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठाचा १०० वा दीक्षांत समारंभ गेल्यावर्षी १६ नोव्हेंबर रोजी होणार होता. परंतु एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याने पदव्या वैध कशा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या डॉ. खडक्कार समितीचा अहवाल अपूर्ण होता. त्यामुळे संबंधित अहवालासंदर्भात नवीन समिती गठित करण्यात आली होती. यात डॉ. खडक्कार यांच्यासमवेत डॉ. के.सी. देशमुख, डॉ. डी.के.अग्रवाल, डॉ. हस्तक, डॉ. नासरे यांचा समावेश आहे. या समितीने संबंधित आरोपांसंदर्भात सुमारे तीन आठवडे चौकशी केली व १,३७८ विद्यार्थ्यांच्या गुणांसंदर्भातील सर्व तपशील तपासले. या समितीचा अहवाल तयार झाला असून, सोमवारी प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांच्यासोबतच डॉ. खडक्कार यांची चर्चादेखील झाली. हा अहवाल अंतिम झाला असला तरी मुद्यांची गंभीरता पाहता अहवाल सादरीकरणासाठी आणखी दोन दिवसांची मुदत मागून घेण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)वेळेच्या गणिताचे कोडे?१०० व्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर कुलपती कार्यालयाने तत्कालीन कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना तक्रारीवर स्पष्टीकरण मागितले होते. डॉ. सपकाळ यांनी पहिल्यांदा तर सर्व पदव्या वैध असल्याचे कळविले होते. परंतु या विद्यार्थ्यांचे गुण नियमानुसार देण्यात आले की नाही हे ठामपणे सांगता येत नाही, असे तीनच दिवसांनी राज्यपाल कार्यालयाला कळविले होते. त्यानंतर दीक्षांत समारंभ ‘पोस्टपोन’ करण्यात आला. डॉ. खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीला या १,३७८ विद्यार्थ्यांचा तपशील तपासण्यास सुमारे तीन आठवड्यांचा अवधी लागला. परंतु मागील नोव्हेंबर महिन्यातील संबंधित तीन दिवसांत खरोखरच इतक्या विद्यार्थ्यांचा तपशील कसा काय तपासण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या वेळेच्या गणितामागे विद्यापीठातील वर्षानुवर्षे चालत आलेले राजकारण तर लपले नाही ना, अशी शंका विद्यापीठ वर्तुळात उपस्थित होत आहे.
दीक्षांत समारंभावरील सावट हटणार?
By admin | Published: July 29, 2014 12:53 AM