लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : जनावरांची निर्दयतेने हत्या करीत गाेमांस विक्री करण्याच्या गोरखधंद्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली. शहरातील काही तरुणांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले असून, याप्रकरणी उमरेड पोलिसांनी वेळीच दखल घेत कारवाई केली.
शेख सादीक शेख बिसमिल्ला (५५, रा. यशोधरा चौक, बिलाल मशीदसमाेर, नागपूर) आणि मोहम्मद अनिस अब्दुल अजिज (४०, महेंद्रनगर, नागपूर) अशी आरोपींची नावे असून, दाेघांनाही गोंमास विक्री करताना रंगेहाथ पोलिसांनी अटक केली. बुधवारी (दि.२३) उमरेड पोलिसांना शेख सादिक शेख बिसमिल्ला याच्या घरी खुलेआम गोमांस विक्रीचा धंदा सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी धाड टाकत घटनास्थळावरून १७ हजार ६०० रुपये किंमतीचे ११० किलो गोमांस जप्त केले. तसेच आराेपींकडील लाकडी ओंडके आणि जुनी वापरातील सुरीसुद्धा जप्त केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रथमदर्शनी पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात ५, ५(अ), (ब),(क), ९(अ) (ब), महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९६० सहकलम ४२९(३४) अन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.