नागपूर : रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक निधीतून संरक्षण भिंत व अंतर्गत रोड बांधण्याविरुद्धच्या प्रकरणात स्वत:ला प्रतिवादी करून घेण्यासाठी डॉ. हेडगेवार स्मृती समितीने सचिव अभय अग्निहोत्री यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.यासंदर्भात न्यायालयात नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांची जनहित याचिका प्रलंबित आहे. डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मालकीचा नाही. हा परिसर समितीच्या मालकीचा आहे. याची याचिकाकर्त्याला माहिती आहे. असे असतानाही याचिकाकर्त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला याप्रकरणात जाणिवपूर्वक गुंतवले. ही याचिका वाईट हेतूने दाखल करण्यात आली आहे. डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर मालक या नात्याने डॉ. हेडगेवार स्मृती समिती याप्रकरणात आवश्यक प्रतिवादी आहे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच स्वत:ची भूमिका मांडता यावी यासाठी समितीला प्रकरणात प्रतिवादी करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. समिती संस्था नोंदणी कायदा-१८६० अंतर्गत नोंदणीकृत आहे, अशी माहितीही अर्जात देण्यात आली आहे.यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यात प्रकरणातील प्रतिवादींमधून संघाचे नाव वगळण्याची विनंती करण्यात आली आहे. डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर संघाच्या मालकीचा नाही व डॉ. हेडगेवार स्मृती समितीशी संघाचा संबंध नाही असा दावा संघाच्या अर्जात करण्यात आला आहे. डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात मनपाच्या सार्वजनिक निधीतील १ कोटी ३७ लाख रुपये खर्चून संरक्षण भिंत व अंतर्गत रोडचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यावर मून यांचा आक्षेप आहे.
संरक्षण भिंत व अंतर्गत रोडचा वादात डॉ. हेडगेवार समिती म्हणते आम्हाला प्रतिवादी करा- हायकोर्टात अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 10:43 PM