नागपूर : शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी एमआयडीसी भागातील इसासनी माधवनगरी येथील एका बंगल्यावर धाड घालून देहविक्रीचा हायटेक अड्डा हुडकून काढला. बंगल्याचा मालक धरमपेठ येथील रहिवासी किशोर जग्याशी फरार झाला असून नितेश सुरेश पुरी (२०) रा. खापरी नाका आणि राजू श्यामराव मेश्राम (४५) रा.विनोबानगर इसासनी या दोघांना अटक करण्यात आली आहे. या अड्ड्यावर दोघी देह व्यापार करताना गवसल्या. त्यापैकी एक अल्पवयीन आहे. दोघींचीही या व्यवसायातून सुटका करण्यात आली. जग्याशीने आपला बंगला देहव्यापारासाठी उपलब्ध करून दिला होता तर नितेश पुरी हा या ठिकाणी मुली आणायचा. हा अड्डा पॉश तर होताच शिवाय हायटेकही होता. खोल्या वातानुकूलित होत्या. आंबटशौकिनांना महागडे मद्य पुरवण्यासाठी मिनी बारचीही व्यवस्था करण्यात आली होती. अड्ड्याच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले होते. या शिवाय ‘अलर्ट’ करणारी सिस्टीम लावण्यात आलेली होती. धोकादायक व्यक्ती आल्यास लागलीच आतील लोकांना सतर्क केले जात होते. या शिवाय बाहेर टेहाळणी करण्यासाठी सुरक्षा गार्ड तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी देहव्यापार करणाऱ्या मुली एका वेळचे पाच हजार रुपये घेत होत्या. मुलीही अशा की कुणालाही पाहताक्षणीच भूरळ पडेल. या अड्ड्याची गुप्त माहिती मिळताच एका नकली ग्राहकाच्या मार्फत या अड्ड्यावर धाड घालण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे , पोलीस उपायुक्त दीपाली मासीरकर, सहायक पोलीस आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार, सहायक पोलीस निरीक्षक अमिता जयपूरकर, हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिडाम, नायक पोलीस शिपाई अजय घाटोड, संजय पांडे, गोपाल वैद्य, मनोजसिंग चव्हाण, योगेश घोडकी, कॉन्स्टेबल प्रफुल बोंदरे, महिला कॉन्स्टेबल अस्मिता मेश्राम, वनिता धुर्वे, नीलेश वाडेकर, फोटोग्राफर सहपोउपनि बळीराम रेवतकर सामाजिक कार्यकर्त्या अॅड. कल्याणी कापसे यांनी केली. आरोपींविरुध्द अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याच्या कलम ३,४,५ आणि ७ अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
देहविक्रीचा ‘हायटेक’ अड्डा इसासनीत गवसला
By admin | Published: March 18, 2015 2:50 AM