नागपूर : पीडितास नुकसान भरपाई देण्यास विलंब करणे म्हणजे त्याला एकप्रकारे शिक्षा देणेच होय, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदविले आहे. प्रकरणातील माहितीनुसार, चिखली (बुलडाणा) येथील विजय पंडागळे यांच्या घरी चोरी झाली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून १७.९५० ग्रॅम सोन्याचा नेकलेस जप्त केला. हा नेकलेस पोलिसांच्या ताब्यात असताना हरवला. यामुळे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशावरून तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई देण्याकरिता संबंधित दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बाजारभावानुसार नेकलेसची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. रकमेचे समान मासिक हप्ते निश्चित करण्यात आले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी ही पद्धत अमान्य केली. नेकलेस हरविण्यात तक्रारकर्त्याची काहीच चूक नाही. अशावेळी दोषी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून नेकलेसची किंमत वसूल होतपर्यंत तक्रारकर्त्याला प्रतीक्षा करायला लावणे अस्वीकार्य आहे. ही पद्धत तक्रारकर्त्याला शिक्षा दिल्यासारखीच आहे, असे मत न्यायालयाने नोंदविले. तसेच, तक्रारकर्त्याला आधी नुकसान भरपाई द्या व त्यानंतर संबंधित रक्कम दोषी पोलीस कर्मचाऱ्यांकडून कायद्यानुसार वसूल करा असे निर्देश दिलेत. १२ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडून नेकलेस हरविल्यामुळे तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई देण्याचे निर्देश शासनाला दिले होते. परंतु, या आदेशाचे पालन झाले नाही. यामुळे तक्रारकर्त्याने यासंदर्भात उच्च न्यायालयाला पत्र लिहिले. हे पत्र रिट याचिका म्हणून स्वीकारले होते.नंतर बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून वसुली प्रक्रियेची माहिती दिली होती.(प्रतिनिधी)
पीडिताला भरपाईस विलंब म्हणजे शिक्षाच
By admin | Published: March 29, 2015 2:34 AM