मेयो : अनुराधा श्रीखंडे यांच्याकडे रुग्णालयाची जबाबदारीनागपूर : औषध पुरवठादाराकडून १५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झालेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये (वाहणे) यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गुरुवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत यावर निर्णय होऊ शकला नाही.टिमकी गोळीबार चौक येथील औषध पुरवठादार आशिष मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्सचे मालक यांनी मेयो इस्पितळाला केलेल्या औषध पुरवठ्याच्या २ लाख ९४ हजार ६६० रुपयांच्या देयकाच्या मंजुरीसाठी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी १५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. १६ जानेवारी रोजी ही लाच डॉ. गजभिये यांनी वसतिगृहातील खानावळ चालविणारा विजय मिश्रा याच्यावतीने मागितल्याचा आरोप करून सापळा रचण्यात आला होता. या प्रकरणात एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. सापळ्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत रात्र झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना अटक न करता १७ जानेवारी रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात हजर होण्याबाबत सूचनापत्र देण्यात आले होते. मंगळवारी डॉ. गजभिये यांनी नेहमीनुसार सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयाचा दौरा केला.‘डीएमईआर’ला झालेल्या प्रकाराची लेखी माहिती लिहिली. परंतु गजभिये यांंनी एसीबी कार्यालयात हजर होण्याचे टाळून अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. गजभिये यांना अटक करण्यासाठी एसीबीची वेगवेगळी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. बुधवारी त्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास एसीबीच्या कार्यालयात शरण आल्या. त्यांना रीतसर अटक करण्यात आली. गुरुवारी डॉ. गजभिये यांना एक दिवसाच्या पोलीस कोठडी रिमांडवर पाठविण्यात आले. यादरम्यान रुग्णालयाची जबाबदारी गुरुवारी डॉ. अनुराधा श्रीखंडे यांच्याकडे सोपविण्यात आली. याला गंभीरतेने घेत डीएमईआरने दुपारीच डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. परंतु सायंकाळी ६ वाजेपर्यंत याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. (प्रतिनिधी)घरात पाच लाख वेतनडॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती शासकीय सेवेतृन निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्ती वेतन म्हणून ८० हजार रुपये मिळतात. निवृत्तीनंतर ते नाशिक येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवा देत आहेत. तिथे त्यांना दोन लाख रुपये मानधन मिळते, तर डॉ. मीनाक्षी गजभिये यांना अधिष्ठाता म्हणून २ लाख १० हजार रुपये वेतन मिळते. साधारण पाच लाख रुपये घरी वेतन येते. असे असताना डॉ. गजभिये यांनी केलेली १५ हजाराच्या लाचेच्या मागणीला घेऊन उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. डॉ. मीनाक्षी गजभिये यांना बुधवारी अटक झाल्यानंतर मेयोचा कारभार मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना दिला जाणार होता, परंतु डॉ. निसवाडे यांनी नकार दिल्यानंतर रुग्णालयातील वयोज्येष्ठतानुसार पॅथालॉजीच्या विभागप्रमुख डॉ. अनुराधा श्रीखंडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. निलंबनाचा प्रस्ताव पाठविलामेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना बुधवारी अटक झाल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला. त्यांच्या निर्णयानंतरच कारवाई होईल.-डॉ. प्रवीण शिनगारेसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग
अधिष्ठाता गजभियेंच्या निलंबनाचा प्रस्ताव
By admin | Published: January 20, 2017 2:16 AM