नागपूर : काचीपुरा येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर ६६ लोकांनी अतिक्रमण करून अवैध बांधकाम केले आहे. प्रत्येक अतिक्रमणाची चौकशी करून अवैध बांधकाम तीन महिन्यात हटवा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिले. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.अवैध बांधकाम करणाऱ्यांना महापालिकेच्या धरमपेठ झोनतर्फे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीसचा कालावधी संपला आहे. या कालावधीत १७ लोकांनी नगररचना विभागाकडे नियमितीकरणासाठी अर्ज केले होते. परंतु अवैध बांधकाम असल्याने विभागाने सर्व अर्ज फेटाळाले आहेत. काचीपुरा येथील अवैध बांधकाम तात्काळ हटवून वैध बांधकामावर विलंब शुल्कासह करआकारणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती झोन अधिकाऱ्यांनी दिली. ठाकरे यांनी काचीपुरा येथील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला.काची समाज व कृषी विद्यापीठ यांच्यात जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु संबंधित जमिनीवर काची समाजाव्यतिरिक्त इतरांनीही मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम करून व्यावसायिक वापर केला जात आहे. येथे लॉन, गोदाम, वाहनाचे शो रूम, हॉटेल, गॅरेज व व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. यामुळे या मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. राजकीय दबावामुळे येथील अतिक्रमण हटविले जात नसेल तर मग शहरातील सर्वसामान्यांनी केलेले अवैध बांधकाम कसे हटविता. असा सवाल त्यांनी केला. विभागातील अवैध बांधकामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी झोन अधिकाऱ्यांची आहे. परंतु येथे ६६ अतिक्रमणे आहेत. या प्रत्येक प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. याला सहा महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. परंतु तीन महिन्यात कारवाई करण्याचे निर्देश दटके यांनी दिले.(प्रतिनिधी)धार्मिक स्थळाबाबत योग्य निर्णय घ्यासार्वजनिक वापराच्या व मोकळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांविषयी लोकांच्या मनात आस्था आहे. ते नियमित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून योग्य निर्णय घ्यावा, अशी सूचना प्रवीण दटके यांनी केली. या संदर्भात न्यायालयाला विनंती करू शकतो. परंतु यामुळे वाहतूक वा शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. विकास ठाकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न उपस्थित केला होता. धार्मिक स्थळांच्या बांधकामावर लोकांनी लाखो रुपये खर्च केले आहे. यापासून कोणालाही त्रास नाही, कुणाचीही तक्रार नाही. अशी धार्मिक स्थळे हटविल्यास लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील. शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाला धार्मिक स्थळांची नवीन यादी सादर करावी, अशी सूचना ठाकरे यांनी केली. यावर योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही हर्डीकर यांनी दिली.समन्वयातून राबवा वृक्षारोपणबांधकाम नकाशा मंजूर करताना नगररचना विभागाकडून संबंधिताकडून वृक्षारोपणासाठी ठेव म्हणून रक्कम घेतली जाते. परंतु नंतर संबंधितांनी वृक्षारोपण केले नाही. याची चौकशी केली जात नाही. उद्यान विभाग याची शहानिशा करीत नाही. यामुळे हिरवळीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेले नागपूर शहर आता चौथ्या क्रमांकावर आले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे किशोर डोरले यांनी निदर्शनास आणले. नगररचना व उद्यान विभागांनी समन्वयातून वृक्षारोपण करण्याचे निर्देश दटके यांनी दिले. तसेच वृक्षारोपणासाठी प्रत्येक सदस्याला दोन लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी वित्त विभागाला दिले.
कृषी विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमण हटवा
By admin | Published: October 27, 2015 4:02 AM