वाडी : नगर परिषदेंतर्गत नवनीत नगर बसथांबा लगतच अतिक्रमण करून मांस विक्रेत्याने दुकान थाटले आहे. हे दुकान त्वरित हटविण्यात यावे, या आशयाचे निवेदन माजी नगरसेविका मंगला वाघमारे यांनी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना दिले आहे.
नवनीत नगर भागातील नागरिकांनी मांस विक्री दुकानाला विराेध दर्शविला. मात्र त्याकडे कानाडाेळा करीत मांसविक्रेता दुकान सुरू ठेवत आहे. उलट नागरिकांसाेबत अरेरावीची भाषा वापरून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. या बसथांब्यालगतचे अतिक्रमण हटविण्याबाबत लेखी तक्रार करण्यात आली. मात्र मांसविक्रेत्यांवर अद्यापही कारवाई केलेली नाही. एकीकडे शहराचा स्वच्छतेत क्रमांक मिळविण्यासाठी प्रशासन धडपड करीत आहे. परंतु नवनीत नगरात महामार्गालगत मांसविक्रीचे दुकान थाटल्याने ये-जा करणाऱ्यांना घाणीच्या समस्येला ताेंड द्यावे लागत असून, एकप्रकारे अस्वच्छतेत भर घातली जात आहे.
फूड सेफ्टी स्टॅन्डर्ड ॲक्ट २०११ नुसार उघड्यावर मांस विक्री करणे, कायद्याने गुन्हा असूनही वाडी शहरात उघड्यावर मांस विक्री जोमात सुरू आहे. नवनीतनगर बसथांब्याला लागूनच मटणाचे दुकान असल्यामुळे याठिकाणी दुर्गंधीमुळे नागरिक थांबत नाही. शिवाय, या दुकानामुळे परिसरात माेकाट कुत्र्यांचा सतत वावर असताे. जणू काही कुत्र्यांसाठीच बसथांबा बनविल्याचे चित्र येथे निर्माण झाले आहे. बसथांबावरील प्रवाशांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहे. या गंभीर समस्येकडे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी लक्ष पुरवून समस्या साेडविण्याची मागणी माजी नगरसेविका मंगला वाघमारे यांनी केली आहे.