नागपूर : सेव्ह मेरिटची भाषा करणारे लोक आरक्षणविरोधी असून त्यांचे पितळ उघडे पडले आहे. दुसरीकडे आरक्षणाच्या समीक्षेची भाषा केली जात आहे. हे सर्व प्रकार आरक्षण हटविण्याचे षड्यंत्र असून सत्ताधारी पक्षाचा याला पाठिंबा आहे, तेव्हा आरक्षण हटविण्याची भाषा करणारे आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सत्तेतून हाकला, आणि स्वत:ची सत्ता संपादित करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रविवारी आदिवासींचा सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. हमराज उईके, दिनेश मडावी, प्रशांत बोडखे, नीरंजन मसराम, अॅड. स्वाती मसराम, मंगला उके, राजेंद्र मसराम प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी अॅड. आंबेडकर म्हणाले, आदिवासींची जीवनपद्धती, संस्कृती वेगळी आहे. तरीही त्यांच्या संस्कृ तीवर आक्रमण केले जात आहे. आजपर्यंत दोन समाजाला आपसात लढवून आपली सत्ता शाबूत ठेवण्याचेच प्रयत्न झाले. परंतु आता आम्ही झुंजणार नाही तर आपली सत्ता मिळवू. काही कुटुंबांनी जसे राजकारण ताब्यात घेतले आहे, तसेच काही कुटुंबांनी आदिवासींच्या जागांवरही ताबा मिळवला आहे. ही राजकीय कुटुंबशाही तोडायला आम्ही निघालो असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.सरकार असंवेदनशीलसांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांकडे सुरुवातीला सरकारने लक्षच दिले नाही. स्थानिक लोकांनी मदत केली नसती तर किमान लाखावर लोकांचा बळी गेला असता. कुही आणि वैनगंगेलाही पूर आला परंतु सरकारने ते उघडकीसही येऊ दिले नाही. हे सरकार असंवेदनशील व उदासीन आहे. काँग्रेसवर आम्ही टीका करतो, परंतु त्यांच्या काळात माणुसकी शिल्लक होती. या सरकारमध्ये ती संपली आहे, अशी टीकाही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.