कोराडी : राष्ट्रीय महामार्गाला लागून सर्व्हिस रोडवर स्थानिक दुकानदार यांनी केलेले अतिक्रमण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलिसांच्या वतीने शुक्रवारी हटविण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यवाहीशी महादुला नगरपंचायतचा संबंध नव्हता. महादुला येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक दोन्ही दिशेने सर्व्हिस मार्गाने वळवण्यात आली आहे. सर्व्हिस मार्गावर दोन्ही बाजूने अनेक दुकानदारांनी व फळभाजी विक्रेत्यांनी दुकाने लावल्याने रस्ता अवरुद्ध झाला होता. त्यामुळे वाहतुकीला खोळंबा निर्माण होत होता. अलीकडच्या काळात अॅम्ब्युलन्सलाही वाहतुकीचा अडथळा निर्माण झाल्याच्या घटना होत्या. या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने व पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. काही दुकानदारांच्या विनंतीनुसार दोन दिवसाचा अवधी अतिक्रमण हटवण्यासाठी देण्यात आला. इतर अतिक्रमण पोलिसांनी हटवले आहे उर्वरित अतिक्रमण दोन दिवसाचे आत न हटवल्यास सर्व साहित्य जप्त करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. अतिक्रमण करणाऱ्यांना दोन दिवसात अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महादूल्यातील महामार्गालगतचे अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:08 AM