हुमैरा अली।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची ओळख तशी तर ‘ग्रीनसिटी’ अशी आहे. मात्र गेल्या काही काळापासून शहरातील प्रदूषणातदेखील वाढ होत आहे. दिवाळीनंतर तर शहरात थंडीसोबतच ‘स्मॉग’चे (धूर आणि धुके यांचे मिश्रण) प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ‘स्मॉग’मुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. नागपूरलादेखील या ‘स्मॉग’चा धोका असून प्रदूषणात झालेली वाढ शहरासाठी धोकादायक ठरू शकते.शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे होऊ शकणाºया संभाव्य धोक्यांबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालादेखील अवगत करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी शहरात दाट धुके असल्याचे जाणवते.मात्र प्रत्यक्षात यात ‘स्मॉग’चे प्रमाणच जास्त आहे. हे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सद्यस्थितीत शहरात ‘मेट्रो’सोबतच अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे हवेतील धूळ, सूक्ष्म कण इत्यादींचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वायूप्रदूषणातदेखील वाढ झाली आहे. यामुळे ‘स्मॉग’ दिसून येत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
लहान मुलांना जास्त धोकालहान मुलांची प्रतिकारकक्षमता विकसित झाली नसते. त्यामुळे हवेतील प्रदूषणाचा लहान मुलांना सर्वात जास्त धोका असतो. ‘एलआरआय’च्या (लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन) रुग्णांत १० टक्क्यांची वाढ झाली आहे. सोबतच त्वचेचे रोग आणि डोळ्यांचे विकारदेखील वाढले आहेत, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ.शम्स खान यांनी दिली.