लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने गांजाची तस्करी करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक करून १६० किलो गांजा जप्त केला. गांजाची किंमत २४ लाख रुपये असून, ७ लाख रुपयांची गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. एका आठवड्यात दिल्लीत जात असलेली गांजाची तिसरी मोठी तस्करी पोलिसांच्या हाती लागली आहे.
आरोपी अजय खेमानंद भट्ट (३० रा. सोमबाजार, विकासनगर, दिल्ली) आहे. अजय दिल्लीत टॅक्सी चालवत होता. लॉकडाऊन व शेतकरी आंदोलनामुळे त्याचा व्यवसाय ठप्प झाला. दरम्यान, तो गाजा तस्करीत असलेल्या दिल्लीतील एका व्यक्तीशी भेटला. अजयला विशाखापट्टणमच्या एका व्यक्तीचा नंबर देऊन गांजा घेऊन जाण्यास सांगण्यात आले. गांजाची एक खेप घेऊन जाण्याच्या मोबदल्यात त्याला २५ हजार मिळणार होते. अजयने एचआर-५५-व्ही-५५८३ या गाडीने विशाखापट्टणमहून दिल्लीकडे गांजा घेऊन रवाना झाला. याची माहिती एनडीपीएस सेलला मिळाली. त्यांनी पारडी पुलावर अजयला पकडण्याची योजना आखली. सोमवारी रात्री अजयच्या कारला थांबविले. कारच्या मागच्या सीटखाली ६ पिशव्यात गांजा भरलेला होता. पोलिसांनी गांजा जप्त करून अजयला ताब्यात घेतले.