लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मेडिकलच्या आकस्मिक विभागासमोर एक ऑटोरिक्षा थांबली. आतील दोन महिलांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांच्याकडून माहिती घेऊन सुरक्षारक्षक डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर, ब्रदर्स, सिस्टरने ऑटोकडे धाव घेतली अन् वेळीच सर्वांनी सतर्कता दाखविल्याने एका महिलेची ऑटोतच प्रसूती झाली. मातेसोबत बाळाचीही प्रकृती आता उत्तम आहे.
रविवारी दुपारी वाठोडा येथील ३० वर्षीय महिला ऑटोमध्ये बसून मेडिकलच्या दारावर पोहोचली. तिला ऑटोतच प्रसव वेदना सुरू झाल्या. तिच्यासोबतच्या महिला आरडोओरड करू लागल्या. सुरक्षा रक्षकाने परिस्थितीची माहिती सीएमओ डॉ. निखिल डोरले यांना दिली.
डॉक्टरांनी ब्रदर जुल्फेकार अली, परिचारिका वंदना भोयर यांना मदतीसाठी घेऊन ‘इमर्जन्सी डिलिव्हरी किट’ घेतली. बाळाचे अर्धे शरीर बाहेर आले होते. यामुळे डॉक्टरांनी ऑटोतच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला अन् पुढील १० मिनिटांतच महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. आकस्मिक विभागातील बालरोग तज्ज्ञांनी बाळाला तपासून देखरेखीखाली ठेवले आहे.
इमर्जन्सी किट तयार
- मेडिकलच्या आकस्मिक विभागात कोणता रुग्ण कसा येईल याचा नेम नसतो. यामुळे येथील यंत्रणा आपल्या तयारीनिशी सज्ज असते.
- मेडिकलच्या दारावर प्रसूती होण्याची ही पहिलीच घटना नाही. यामुळे अशा आकस्मिक प्रसूतीसाठी विभागात स्वतंत्र इमर्जन्सी किट ठेवलेली असते.