सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूत जनुकीय बदल (म्युटेशन) तपासणीसाठी ‘जीनोम सिक्वेंसींग’ केली जाते. या तपासणीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही’ किंवा इतरत्र प्रयोगशाळेत नमुने पाठवावे लागतात. परंतु आता मेडिकलमध्येच ही तपासणीची सोय असणार आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणाऱ्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे निदान नागपुरातही होण्याची शक्यता आहे. याशिवाय, दोन कोटी खर्चून ‘आरटीपीसीआर’चाचणीचे नवे यंत्र खरेदी केले जाणार आहे.
कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत संसर्ग फैलावाची पद्धती बदलली. पूर्वी कुटुंबातील एकाला लागण झाली तर दोन व्यक्ती बाधित आढळून यायच्या. मात्र, आता सर्वच सदस्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले. यामागे विषाणूचे स्वत:च्या जनुकीय रचनेमध्ये केलेले बदल, हे अभ्यासातून समोर आले. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या दिसून येण्यामागे ‘डेल्टा’ विषाणूचा प्रकार होता. आता तिसऱ्या लाटेसाठी ‘डेल्टा प्लस’ कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. यासाठी मेयो, मेडिकलमधून महिन्याकाठी प्रत्येकी २५ रुग्णांचे नमुने पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. परंतु सर्वच ठिकाणाहून नमुने येत असल्याने अहवाल येण्यास उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे. यावर मेडिकलने पुढाकार घेत ‘जीनोम सिक्वेंसींग’चा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. प्रस्तावाला लवकरच मंजुरीही मिळण्याची शक्यता आहे.
-यंत्र सामुग्री व मनुष्यबळासाठी प्रयत्न
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता मेडिकलमध्ये आवश्यक सोयी उपलब्ध करण्यासाठी जीनोम सिक्वेंसिंगचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. परवानगी मिळताच यंत्र सामूग्री, त्याचे व्यवस्थापन, मटेरियल्स, टेस्टिंग किट्स आणि मनुष्यबळ तयार केले जाईल. हे यंत्र हाताळण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाईल.
-नव्या आरटीपीसीआर यंत्रासाठी दोन कोटी
डॉ. गुप्ता म्हणाले, ‘आरटीपीसीआर’च्या चाचण्या वाढविण्यासाठी दोन नवे यंत्र खरेदीला पालकमंत्री नितीन राऊत व जिल्हाधिकारी विमला आर. यांनी हिरवा झेंडा दिली आहे. दोन कोटींच्या यंत्र खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या यंत्रामुळे एकाच दिवशी ८ हजारांवर चाचण्या होतील.
-रोज चार ते पाच हजार तपासण्या
कोरोनाची दुसरी लाट तीव्र असताना रोज २५ हजारांवर चाचण्या व्हायच्या. आता रुग्णसंख्या कमी असल्याने चार ते पाच हजाराच्या दरम्यान चाचण्या होत आहेत.
मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रांसह शहरातील १० महत्त्वाचा चौकात कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे.
‘जीनोम सिक्वेंसिंग’मुळे रुग्णसेवेस मदत
कोविड विषाणू स्ट्रेनचा मानवावर किती परिणाम होतो हे ‘जीनोम सिक्वेसिंग’मधून कळते. सध्या छोट्यातल्या छोट्या माहितीसाठी पुण्याच्या एनआयव्हीवर अवलंबून राहावे लागते. परवानगी मिळाल्यास विषाणूचे योग्य विश्लेषण येथेच होईल. यामुळे संबंधित रुग्णावरील उपचार पद्धती, प्रक्रिया यात जर काही बदल करायचा असेल किंवा ती वाढवायची असल्यास तसा निर्णय घेऊन रुग्णाचा उपचार केला जाईल. रुग्णसेवेत याची मोठी मदत होईल.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल