नागपूर : जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामासाठी सरकारकडे १ लाख ६० हजार ४९२ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे तर खरिपाच्या एकूण ४ लाख ७४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी ८३ हजार २१२ क्विंटल बियाण्याची गरज पडणार आहे. जिल्हा कृषी विभागाने नुकत्याच केलेल्या नियोजनात ही मागणी नोंदविण्यात आली आहे.
१३ तालुक्यांमधील कृषी क्षेत्रासाठी यंदा खरिपासाठी एकूण १,६०,४९२ मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा कल आणि गरज लक्षात घेऊन मिश्र खते आणि युरियाला यंदाही अधिक मागणी आहे. त्या तुलनेत डिएपी आणि एमओपीला मागणी कमी आहे.
जिल्ह्यात एकूण ८३,२१२ क्विंटल बियाण्याची मागणी प्रस्तावित आहे. यात अधिक भर खासगी बियाण्यावर असून, राष्ट्रीय बियाणे निगमच्या बियाण्याची मागणी कमी दर्शविण्यात आली आहे. ‘महाबिज’च्या ३०,१०३ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. तर खासगी बियाण्याची मागणी ५०,१०९ क्विंटल आहे. राष्ट्रीय बियाणे निगमकडून ३ हजार क्विंटल बियाणे मागवले जाणार आहे. तीळ, कापूस (बिटी), मूग, उडिद, तूर, भात, सोयाबिन, भुईमूग, मका, एरंडी या पिकांचा जिल्ह्यातील खरिपाच्या हंमागात समावेश आहे.
..
सोयाबिनसाठी सर्वाधिक मागणी
यंदाच्या खरिपासाठी सोयाबिनच्या बियाण्याची मागणी ४८,८५१ क्विंटल असून, ती सर्वाधिक आहे. यंदा सोयाबिनचे पेरणी क्षेत्र कमी केले असले, तरी पेऱ्यामध्ये बियाणे अधिक लागत असल्याने ही मागणी अधिक दिसत आहे. भातासाठी २१ हजार ६०० क्विंटल बियाण्याची गरज दर्शविण्यात आली आहे. यात महाबिजचे ६ हजार क्विंटल तर खासगी बियाणे १५,६०० क्विंटल आहे. बीटी कापसासाठी ५,०५८ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. यात महाबिजचे ५००, खासगीचे ४,५५८ क्विंटल बियाणे आहे. मागील खरीप-२०२०मध्ये ८७,३१८ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती.
...
अशी आहे खतांची मागणी
युरिया - ४५,९१७.२ मे. टन
डिएपी - २२,७४०.६ मे. टन
एमओपी - ४,८६७.३ मे. टन
मिश्र खते - ५१,०३७.६ मे. टन
एसएसपी - ३५,९२९.३ मे. टन
एकूण १,६०,४९२ मे. टन
...