नागपूर : मेडिकलमध्ये म्युकरमायकोसिसचे १०७ रुग्ण उपचाराखाली आहेत. प्रत्येकाला ‘अॅम्पोटेरीसीन बी लायपोसोमल’चे रोज पाच ते सहा इंजेक्शन लागतात. त्यानुसार जवळपास रोज ५३५ इंजेक्शन उपलब्ध होणे आवश्यक असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकदिवसाआड तेही केवळ ८३ इंजेक्शन मिळत असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे, म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आता दीड महिना होत असतानाही इंजेक्शनसह इतरही औषधांचा पुरवठा सुरळीत झाला नसल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट ओढावले आहे. या आजारावरील औषधांचा प्रचंड तुडवडा पडला आहे. या आजाराच्या उपचारात महत्त्वाचे असलेले ‘अॅम्पोटेरीसिन बी लायपोसोमल’ इंजेक्शन बाजारात उपलब्धच नाही. मात्र काळाबाजारात ७,५०० रुपये किमतीचे हे इंजेक्शन १५ ते २० हजारांत विकले जात आहे. यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाने याची खरेदी व वाटपप्रक्रिया शनिवारपासून आपल्या हाती घेतली. याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकिसांवर दिली. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयाची आवश्यकता पूर्ण झाल्यावरच खासगी रुग्णालयांना म्युकरमायकोसिसवरील औषधी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु त्याचे पालन होत नसल्याने इंजेक्शनचा वाटपात प्रचंड घोळ सुरू आहे.
-औषधीविना रुग्ण बरे कसे होणार, डॉक्टरांसमोर प्रश्न
मेडिकलमध्ये मंगळवारी म्युकरमायकोसिसचे कोरोनाबाधित २९, तर ‘नॉनकोविड’चे ७८ असे एकूण १०७ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ६०वर रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या आजारात तातडीने औषधोपचार सुरू करणे महत्त्वाचे ठरते. विशेषत: शस्त्रक्रियेनंतर ‘अॅम्पोटेरीसिन बी लायपोसोमल’ हे इंजेक्शन पाच ते सहा वेळा द्यावे लागते. त्यानुसार रोज पाच इंजेक्शननुसार ५३५ इंजेक्शनची गरज असताना शनिवारी ९० दिले जाणार असल्याचे सांगून ८४ दिले तर, सोमवार केवळ ८३ इंजेक्शन देण्यात आले. यामुळे अनेक रुग्ण विनाइंजेक्शन राहत असल्याने, ते बरे कसे होणार या चिंतेत डॉक्टर आहे.
- दिलेल्या १३ मधूनही खासगी हॉस्पिटलला ८ इंजेक्शन देण्याचे पत्र
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णाने सांगितले, रुग्णालयात जवळपास म्युकरमायकोसिसचे ९ रुग्ण आहेत. प्रत्येकी पाच नुसार ४५ इंजेक्शनची गरज असताना मंगळवारी ‘अॅम्पोटेरीसिन बी लायपोसोमल’चे १३ इंजेक्शन मिळाले. त्यातही खासगी हॉस्पिटलमधील एका रुग्णाचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र दाखवून ८ इंजेक्शन घेऊन गेले. यामुळे उर्वरित ५ इंजेक्शन कोणाला द्यावे व कुणाला नाही, याची अडचण झाली.