चर्चा करून घेतल्या शुभेच्छा : प्रदेशाध्यपदी फेरनिवड ?नागपूर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची आज, सोमवारी मुंबई येथे निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे रविवारी रात्री नागपुरात दाखल झाले. रात्री १०.१५ च्या सुमारास वाड्यावर जाऊन त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत गडकरी यांनी दानवे यांना शुभेच्छा दिल्या असून दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आहे.वाड्यावर तासभर चर्चा नागपूर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची सोमवारी मुंबईत निवड होणार असल्यामुळे नागपुरातील बहुतांश पदाधिकारी सायंकाळी मुंबईसाठी रवाना झाले. तर, दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष दानवे रात्री नागपुरात दाखल झाले. दानवे थेट वाड्यावर पोहचले. त्यांनी गडकरींची भेट घेतली. त्यांनी सुमारे तासभर गडकरींशी चर्चा केली. प्रदेशाध्यपदी फेरनिवड व्हावी या उद्देशाने दानवे हे गडकरींच्या शुभेच्छा मिळविण्यासाठी नागपुरात आले होते. सूत्रांच्या मते त्यात त्यांना यशही आले. गडकरींशी भेटीनंतर दानवे यांनी संघ नेत्यांशीही भेट घेण्याचे प्रयत्न केले. पण बराच उशीर झाल्यामुळे भेट होऊ शकली नाही. प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड व नागपूर भेट याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता दानवे म्हणाले, मी नागपुरात नेहमीच येत असतो व आलो की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतो. तशीच आजची भेट आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज भरले जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष कोण होईल हे तेव्हाच ठरेल, असे सांगून त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले. (प्रतिनिधी)
पाठिंब्यासाठी दानवे गडकरींच्या भेटीला
By admin | Published: January 18, 2016 2:43 AM