आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपलब्ध जागांच्या तुलनेत विद्यार्थी संख्या अधिक असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत लक्ष्मीदर्शनाचा खेळ सुरू झाला आहे. अनेक संलग्नित महाविद्यालयांकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी डोनेशनची मागणी करण्यात येत आहे. विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांत असे प्रकार जास्त प्रमाणात सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार इतर विद्यापीठांतून नागपुरात प्रवेश घ्यायला येणारे विद्यार्थी महाविद्यालयांच्या या जाळ्यात अडकत आहेत. विज्ञान अभ्यासक्रमानुसार डोनेशनची रक्कम मागितली जात आहे. डोनेशन द्यावी लागू नये यासाठी अनेकांनी विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागासाठी प्रयत्न केले होते. मात्र गुणवत्ता यादीत स्थान न मिळाल्याने त्यांना संलग्नित महाविद्यालयांमध्ये जावे लागले. काही महाविद्यालयांनी तर व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घ्यायला विद्यार्थ्यांना भाग पाडले. यासंबंधात काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे याची तक्रार केली आहे. यासंबंधात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी याबाबत कुठलीही तक्रार मिळाली नसल्याचे स्पष्ट केले. जर प्रवेश प्रक्रिया समितीकडे कुठली तक्रार आली तर त्याची दखल घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या हलगर्जीचा फटका
विद्यापीठाने केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया सुरू केली होती. मात्र महाविद्यालयांच्या दबावापोटी खासगी महाविद्यालयांना त्यातून वेगळे करण्यात आले. याचा फायदा महाविद्यालयांकडून उचलण्यात येत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.
अभ्यासक्रमनिहाय डोनेशन
अभ्यासक्रम : डोनेशन
संगणक विज्ञान : ७० हजार ते दीड लाख
जैवरसायनशास्त्र : ७० हजार ते दीड लाख
मायक्रोबायोलॉजी : ७० हजार ते दीड लाख
भौतिकशास्त्र : ५० हजार ते ८० हजार
रसायनशास्त्र : ४० हजार ते ७५ हजार
एम.कॉम. : ४० हजार ते ६० हजार