नागपूर : विदर्भ आंदोलनातील प्रखर नेतृत्व आणि लढाऊ व्यक्तिमत्त्व असलेले जांबुवंतराव धोटे यांचे नागपुरात स्मारक उभारले जावे, अशी मागणी विदर्भ युवा संघाचे अध्यक्ष किशोर करांगळे यांनी केली आहे.
जांबुवंतराव धोटे यांची चौथी पुण्यतिथी १८ फेब्रुवारीाला आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी पुढे आली आहे. यासंदर्भात करांगळे यांनी केलेल्या मागणीनुसार, धोटे पाचवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार होते. नागपूरचे खासदारपदही त्यांना मिळाले होते. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी नागपूरसह विदर्भभरातून त्यांनी आंदोलने केली. त्यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्यने निघणारे मोर्च हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्य होते. विदर्भाच्या मागणीपुढे त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री पद, रेल्वेमंत्री पद आणि मुख्यमंत्री पद अव्हेरले, हा इतिहास आहे. आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘विदर्भवीर’ ही पदवी दिली होती. निसर्ग, साहित्य, नाट्यक्षेत्रावर त्यांचे प्रेम होते. त्यांच्या स्मारक उभारणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा विदर्भ युवा संघाने व्यक्त केली आहे.