कमल शर्मा
नागपूर : रुस-युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध लवकर संपावे, अशी प्रार्थना अख्खे जग करीत असले तरी हे युद्ध २०२५ पर्यंत चालेल, असा महानिमिर्तीला अंदाज आहे. कदाचित यामुळेच उरण गॅस प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या वीजेचा दर प्रति युनीट ८.९८५ रुपये करण्याची मागणी केली आहे.
महानिर्मितीने महाराष्ट्र प्रदेश विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल करीत वीज दरात मोठी वाढ करण्याची मागणी केली आहे. याचाच भाग म्हणून कंपनीने गॅसवर आधारित उरण प्रकल्पातील वीज वर्ष २०२३-२४ साठी प्रति युनिट ८.५५७ व २०२४-२५ साठी ८.९८५ करण्याची मागणी केली आहे. आयोगाने या काळासाठी २.९३२ रुपये व ३.०२० रुपये प्रति युनिट दर मंजूर केले होते.
महानिमिर्तीच्या सूत्रांच्या मते, देशभरातील गॅसवर आधारित वीज प्रकल्पांपैकी उरण प्रकल्पाचेच वीजदर सर्वात कमी होते. येथे गेल व ओएनजीसीमार्फत गॅसपुरवठा होतो. मात्र रुस-युक्रेन युद्धामुळे गॅसचे दर तिप्पट वाढले आहेत. महानिमिर्तीच्या अधिकाऱ्यांच्या मते युद्धामुळे पुढील काही वर्षे गॅसचे दर खाली येण्याची शक्यता नाही. खत उत्पादन कंपन्याही गॅसची मागणी करत आहेत. उरणला ३.५ मिलियन लीटर क्युब गॅसची गरज भासते. मात्र, १.२ मिलियन लीटर क्युब गॅस उपलब्ध होत आहे. परिणामी ६७२ मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प फक्त २४० मेगावॅट उत्पादन करू शकत आहे.
१.७९ वरून ८.५७ डॉलर झाला गॅसचा दर
आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२० रोजी हे दर १.७९ डॉलर प्रति एमएमबीटीयू होते. २०२३ मध्ये ते ८.५७ डॉलर झाले. १ ऑक्टोबर २०२१ रोजी दर २.९० डॉलर होते. रुस-यूक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर १ एप्रिल २०२२ रोजी हे दर ६.१० डॉलरवर पोहोचले व १ ऑक्टोबर २०२२ रोजी ८.५७ डॉलरचा पल्ला गाठला.