नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपुरातील १०० कोटीचे भूखंड २ कोटीत विकून भ्रष्टाचार केला तसेच न्यायप्रशासनातील कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली.
राज्य सरकारचा धिक्कार असो, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा देत विरोधीपक्षाच्या आमदारांनी विधान परिषद ते विधान सभेच्या पायऱ्यांपर्यंत घोषणा देत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी भाई ठाकूर व विधानपरिषदेचे विरोधी पक्षातील सर्व आमदार उपस्थित होते.
न्यायलयाने या प्रकरणात स्थगिती दिली असतानाही मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून हा घोटाळा केला असल्याचा आरोप दानवे यांनी केला. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सारवासारव करीत सरकारला वाचविण्याचा प्रयत्न केला. ते मुख्यमंत्री असताना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे फडणवीस यांनी पचविल्याचा आरोप भाई जगताप यांनी यावेळी केला.
काय आहे प्रकरण
नागपूरमधील झोपडपट्टीधारकांच्या आवास योजनेसाठी भूखंड ताब्यात घेण्यात आले होते. जे १६ जणांना भाडेतत्त्वावर दिले असल्याचे निदर्शनास आले. हे भूखंड तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्या आदेशानुसार वाटप केल्याचे याचिकेत म्हटले आहे. हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाला न्याय प्रशासनातील हस्तक्षेप असल्याचे म्हणत न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले.