कोरोनाच्या काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले. प्रवासी वाहतूक बंद असली तरी माल वाहतूक सुरू ठेवून एसटीच्या उत्पन्नात भर घातली. आतापर्यंत एसटीचे राज्यभरात आठ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी २६१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु केवळ १० ते १२ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच एसटी महामंडळाने ५० लाखाचे विमा कवच दिले आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांच्या वारसांना १ जून रोजी एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त त्वरित ५० लाखांचे विमा कवच द्यावे, त्यांच्या वारसाला नोकरी द्यावी, कर्मचाऱ्यांना थकीत असलेला महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे, महासचिव हनुमंत ताटे, नागपूरचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी परिवहनमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
.........