लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात १ लाख ८७ हजार हेक्टरवर लिंबुवर्गीय फळे असून त्यापासून १५ लाख टन उत्पादन मिळत आहे. यातच बांगलादेशातून नागपुरी संत्र्याला मागणी वाढली असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा संत्रा उत्पादन करण्याचे आवाहन राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ.मिलिंद लदानिया यांनी केले.‘संत्रा प्रक्रिया, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यात संधी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया, दिनेश कुमार, डॉ. आय. पी. सिंग, डॉ. अंबादास हुच्चे, डॉ. आर. के. सोनकर, डॉ. परमेश्वर शिरगुरे यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. लदानिया म्हणाले, संत्रा उत्पादनासोबत प्रक्रिया उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. उत्पादन होणाऱ्या संत्र्यांपैकी ८० टक्के संत्री खाण्यासाठी तर २० टक्के संत्र्यावर प्रक्रिया करण्यात येते. त्यापासून ज्युस, जेली, जॅम, कँडी, फ्रुट बार, आईसक्रीम तयार करण्यात येतात. डॉ. दिनेश कुमार म्हणाले, वर्गीकरण, स्वच्छता, मेणाचा लेप, ग्रेडिंग, पॅकेजिंग केलेल्या संत्र्याला बांगलादेशात मागणी आहे. त्यासाठी संत्र्याच्या ढीगावर बसू नये, त्यामुळे फळाचे नुकसान होते. संत्रा ठेवण्यासाठी क्रेटचा वापर करावा, लाकडाऐवजी कागदात पॅकिंग करावे. लिंबु, संत्रा एकत्र स्टोरेज करू नका. संत्र्याची इतर देशात निर्यात करण्यासाठी लायसन्स काढण्याची गरज असून एक्स्पोर्ट करणाऱ्यांच्या माध्यमातून पाठविता येत असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. आय. पी. सिंग म्हणाले, लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्राने नऊ जाती विकसित केल्या आहेत. देशात १ कोटी ५० लाख रोपट्यांची गरज असून केंद्रात रोगमुक्त रोपटे तयार करण्यात येतात. डॉ. अंबादास हुच्चे म्हणाले, पाणी आणि खत व्यवस्थापन चांगले असल्यास १२०० ते १५०० फळे एका झाडाला मिळतात. जून महिन्यात पोटॅशियम नायट्रेट १५ दिवसाच्या अंतराने तर आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात कोरमिक्वट क्लोराईट २००० पीपीएमच्या दोन फवारण्या आवश्यक आहेत. डॉ. आर. के. सोनकर यांनी संत्र्यांच्या झाडात टमाटर, वांगे, भेंडी, लवकीचे आंतर पीक कसे घ्यावे यावर मार्गदर्शन केले. डॉ. परमेश्वर शिरगुरे यांनी पाणी आणि खत नियोजन यावर संत्रा उत्पादकांना मार्गदर्शन केले. पाण्याच्या योग्य नियोजनाशिवाय एक्स्पोर्ट क्वालिटीची संत्री तयार होत नसल्याची माहिती त्यांनी दिली.