लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हीएनआयटीतील विद्यार्थी मनोज कुमार गणप्पुरमने आत्महत्या केल्यावर कुटुंबीयांना विश्वास होत नसून त्यांनी यात गडबड असल्याची शंका उपस्थित करून तपासाची मागणी केली आहे.बुधवारी सायंकाळी आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळाली होती. मनोज कुमार बीटेक मायनिंगमध्ये पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी सायंकाळी वसतिगृहाचा दरवाजा तोडल्यानंतर तो खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. शिक्षकांनी तो नापास झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, अशी शंका उपस्थित केली होती. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी यावर आक्षेप घेतला आहे. मनोज कुमारचे कुटुंबीय घटनेची माहिती मिळताच आज पहाटेच नागपूरला पोहोचले. त्यांच्या कुटुंबात आईवडिल, दोन बहिणी आहेत. वडिलांना पाच भाऊ आहेत. सर्वांचे संबंध चांगले आहेत. कुटुंबीयांच्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी मनोज आपल्या चुलत बहिणीच्या लग्नात आला होता. त्यावेळी त्याची बहिणींसोबत नापास झाल्याची चर्चाही झाली होती. त्याने सर्व पेपर सहज देणार असल्याचे सांगितले होते. काही दिवसानंतर त्याने दुसऱ्या बहिणीच्या लग्नात येणार असल्याचे सांगितले होते. १६ जुलैला परीक्षा आटोपली. तोपर्यंत मनोज सामान्य होता. त्याने ऑनलाईन जेवण बोलावले होते. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार बुधवारी चुलत बहिणीचा वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी मनोजचा फोन न आल्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटली. त्यांनी संपर्क केल्यानंतर काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने कुटुंबीयांनी वसतिगृहाच्या वॉर्डनसोबत संपर्क केला. त्यानंतर घटनेची माहिती मिळाली. कुटुंबीयांच्या मते त्यांना मनोजच्या आत्महत्येवर विश्वास नाही. त्याच्या खोलीत सुसाईड नोटही मिळाली नाही. मनोजचा मोबाईलही संशयास्पदरीत्या गायब आहे. पोलीसही मोबाईलची काहीच माहिती नसल्याचे सांगत आहेत. व्हीएनआयटी प्रशासनाने त्यांना वसतिगृह किंवा घटनास्थळही दाखविले नाही. त्यांना थेट शवविच्छेदनासाठी येण्यास सांगण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.