नागपूर : नागरिकांनी संविधान वाचावे, तेव्हाच आपल्या अधिकारांची जाणीव हाेईल. भारत देश कुटुंबाप्रमाणे आहे व या कुटुंबाचा पाया मजबूत आहे. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले आहेत. मात्र, त्या अधिकारांची मागणी नागरिक म्हणून करा, धर्माच्या नावावर नव्हे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरीफ माेहम्मद खान यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ, तसेच ह्युमॅनिटी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमाला आयाेजित करण्यात आली आहे. याअंतर्गत गुरुवारी ‘देशाच्या प्रगतीसाठी विविध धार्मिक समुदायांमध्ये शांतता व सद्भावनेची गरज’ या विषयावर राज्यपाल आरीफ खान यांनी मार्गदर्शन केले.
राज्यपाल आरीफ खान म्हणाले, संविधानाने प्रत्येकाचे अधिकार निश्चित केले आहेत आणि प्रत्येकाला समान अधिकार प्राप्त आहेत. या देशात काेणत्याही व्यक्तीवर धर्म, जात, संप्रदायाच्या आधारावर भेदभाव हाेणार नाही. मात्र, याची जाणीव संविधान वाचल्याशिवाय हाेणार नाही. काेणत्याही देशात नांदणारी शांतता ही त्या देशाच्या प्रगतीचा आधार असताे. जिथे शांतता आहे, ताेच देश प्रगती करताे.
आपसात प्रेम आणि बंधुभाव जाेपासल्यानेच शांती प्रस्थापित हाेते. असंताेष निर्माण हाेण्याची अनेक कारणे आहेत. चांगल्यात चांगल्या गाेष्टीचा वाईट उपयाेग केल्यानेही तसे हाेते. धर्म अतिशय पवित्र गाेष्ट असून ती व्यक्ती व समाजाला जाेडते. मात्र, अनेकदा लाेक आपल्या पद्धतीने धर्माची व्याख्या करतात. धर्माचा उपयाेग लाेकांची विभागणी करण्यासाठी हाेऊ नये. एकात्मता हा भारताच्या संस्कृतीचा महत्त्वाचा गुण आहे. इंग्रजांनी ही एकता ताेडण्यासाठी अनेक धाेरणे राबविली. जे लाेक आपल्या इच्छांना नियंत्रित करू शकत नाही, अशा लाेकांपासून दूर राहण्याचे आवाहन राज्यपाल खान यांनी केले.
राज्यपाल म्हणाले..
- भारत एका कुटुंबाप्रमाणे आहे.
- देशाच्या संविधानाने प्रत्येकाचे अधिकार निश्चित केले आहेत.
- देशाची मूलभूत शांतता ही त्या देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे.
- आपल्या इच्छांना अनियंत्रित हाेऊ देऊ नका.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, ट्रस्टचे माजीद पारेख, प्र-कुलगुरू डाॅ. संजय दुधे, कुलसचिव डाॅ. राजू हिवसे, फोरम फॉर प्रमोटिंग मॉडरेट थॉटचे महासचिव फैज उर रहेमान प्रामुख्याने उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे सहायक प्राध्यापक डाॅ. संताेष गिऱ्हे यांनी केले.