नागपूर : कोरोनाचा आघात झालेल्या वकिलांसाठी १०० कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे अध्यक्ष अॅड. अनिल गोवारदीपे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे राज्यातील सुमारे ४०० वकिलांचा मृत्यू झाला आहे, तर ४ हजार वकिलांना कोरोनाची लागण झाली आहे. बार कौन्सिलच्यावतीने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वकिलांच्या कुटुंबियांना १ लाख रुपये तर कोरोना उपचारासाठी ५० हजार रुपये दिले जात आहेत. परंतु, ही मदत तोकडी आहे. वकिलाच्या उत्पन्नावर त्याचे संपूर्ण कुटुंब अवलंबून असते. त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब संकटात सापडते. सध्या न्यायालयात नियमित कामकाज होत नसल्यामुळे वकिलांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्याकरिता, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वकिलांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आणि कोरोना उपचारासाठी १ लाख रुपयांची मदत करणे आवश्यक आहे, असे अॅड. गोवारदीपे यांनी पत्रात म्हटले आहे.