लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगर व ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पुढील संभाव्य लाटेला लक्षात घेता, राज्य आपत्ती मदत निधीतून (‘एसडीआरएफ’) १०० कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर केला आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळातील कोविड परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘एसडीआरएफ’मधून शंभर कोटी रुपयांचे अतिरिक्त मागणी केली आहे. औषधे, ऑक्सिजन खरेदी, यंत्रसामुग्रीची खरेदी व वैद्यकीय उपाय योजनासाठी या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संस्था यांच्याकडे सामाजिक दायित्व निधीची मागणीही जिल्हा प्रशासनाने केली आहे. आतापर्यंत केवळ वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडकडून ११.८८ कोटी प्राप्त झाले आहे. सामाजिक, औद्योगिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात मदतीची जिल्हा प्रशासनाने अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक असून, तो नियंत्रित व समतोल असावा, यासाठी चार सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात व निरीक्षणात ऑक्सिजनचे वितरण होणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्याबाबतच्या पालकमंत्र्यांच्या सूचनेला पहिला प्रतिसाद नरखेड व कुही तालुक्यात मिळाला असून, या ठिकाणच्या ऑक्सिजन प्लांट निर्मितीचे कार्यारंभ देण्यात आले आहेत. इंदोरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या ठिकाणीही ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली जाणार असून, १२ तारखेला उद्घाटन होणार आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ४,१३६ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले. शहरातील १५७ तर ग्रामीणमधील ४९ शासकीय व खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरचे वाटप करण्यात आले.
शुक्रवारला १११ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा
७ मे रोजी जिल्ह्यात १११ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला. ७६ मेट्रिक टनची गरज होती. ४१ मेट्रिक टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे. ऑक्सिजन फीलिंग सेंटरवरून ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील जगदंबा, भरतीया, आदित्य, आसी, रुक्मिणी या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लांटमधून १३८ मेट्रिक टनाची क्षमता आहे. त्यापैकी मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे, लता मंगेशकर हॉस्पिटल, ॲलेक्सिस हॉस्पिटल, अवंती, क्रिम्स, ऑरेंज सिटी, शुअर टेक, वोक्हार्ट, आशा हॉस्पिटल कामठी, ७१ मेट्रिक टनची गरज असताना, ७० मेट्रिक टन ऑक्सिजन वितरित करण्यात आला आहे.
रात्री पोहोचणार चार टँकर
ओडिसा राज्यातील भुवनेश्वर नजीकच्या अंगुल येथील स्टील प्लांटमधून नागपूरसाठी ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. नागपूरला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत टँकरचा पुरवठा होणार आहे, याशिवाय काल गुरुवारी पाठविण्यात आलेले चार टँकर शनिवारी रात्री पोहोचणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.