नागपूर : आम्हाला विदर्भ विकास मंडळ नको, तर एकदाचे वेगळे राज्य देऊन विकासाचा हक्क द्या, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनातून केली.
राज्यपाल नागपूर भेटीवर आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे जाऊन त्यांची भेट घेतली आणि निवेदन देऊन चर्चा केली. शिष्टमंडळात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर जिल्हाध्यक्ष अरुण केदार सहभागी होते.
२८ सप्टेंबर १९५३ ला झालेला नागपूर करार व त्यानंतर १ मे १९६० ला विदर्भाला महाराष्ट्रात सामील करून महाराष्ट्राची निर्मिती झाली. यात नागपूर करारानुसार विदर्भ विकासासाठी ठरलेला २३ टक्के वाटा मिळाला नाही. वैधानिक विकास मंडळाबाबत शब्द पाळला नाही, त्यामुळे अनुशेष दूर झाला नाही. कोरोनाच्या महामारीमुळे राज्याच्या अर्थसंकल्पात ६७ टक्के कपात केली असून राज्यावरील कर्जाचा डोंगर ५ लाख २० हजार कोटींवर गेला आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघाले आहे. अशा स्थितीत वैधानिक विकास मंडळाचे पुनरुज्जीवन करून अनुशेष भरून निघणे शक्य नाही. त्यामुळे वैधानिक विकास मंडळ नको, तर वेगळे स्वतंत्र विदर्भ राज्य द्या, अशी मागणी या भेटीत करण्यात आली.